अरे बापरे ! प्रवाशांमध्ये घबराट, पळापळ…रेल्वे फलाटावर गजराज धडकले; एक तासभर रंगला होता थरार

बुधवारी रात्री उशिरा हरिद्वार रेल्वे स्थानकावरील फलाटावर अचानक गजराजची धमाकेदार एंट्री झाली अन् प्रवाशांची त्रेधातिरपीट उडाली. फलाटावरील सर्व प्रवासी सैरभैर पळू लागले. यामुळे रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली.

  नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, हरिद्वार.

  एरवी जंगलात मोठ्या एटीत चालणारे गजराज आपण सर्वांनी पाहिले असतीलच. मात्र, एखाद्या रेल्वे स्थानकाच्या फलाटावर फेरफटका मारणारे गजराज पाहिल्यानंतर कुणालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. याचा प्रत्यक्ष अनुभव हरिद्वार रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना आला.

  बुधवारी रात्री उशिरा हरिद्वार रेल्वे स्थानकावरील फलाटावर अचानक गजराजची धमाकेदार एंट्री झाली अन् प्रवाशांची त्रेधातिरपीट उडाली. फलाटावरील सर्व प्रवासी सैरभैर पळू लागले. यामुळे रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच, आरपीएफ आणि जीआरपीसह रेल्वे कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नानंतर गजराजांना जंगलाकडे परतावून लावले.

  वन्यप्राण्यांची शहरी क्षेत्राकडे कूच

  मानवी वस्तीत होणारा प्राण्यांचा शिरकाव, मानवाचे जंगलावरील अतिक्रमण, वृक्षतोडीमुळे नैसर्गिक अधिवासाचा झपाट्याने होत असलेला ऱ्हास आणि महामार्ग बांधणीमुळे धोक्यात आलेले कॉरिडॉर, या सर्वांचा एकत्रित परिणाम वन्यजीवांच्या नैसगिर्क अधिवासावर झाला आहे आणि परिणामी वन्यजीवनच धोक्यात आले आहे. याचाच परिपाक म्हणजे, वन्यप्राण्यांनी आता मोठ्या प्रमाणात शहरी भागांकडे कूच केली आहे.

  याचाच प्रत्यय हरिद्वार रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना आला. हरिद्वार-डेहराडून रेल्वे ब्लॉक राजाजी टायगर रिझर्व्ह सीमेला लागून आहे. यामुळे येथे हत्ती आणि इतर वन्यप्राण्यांचे येणे-जाणे सर्वसाधारण बाब आहे. काही दिवसांपूर्वी पूर्व राजाजी टायगर रिझर्व्हच्या चीला रेंज येथून वाट भटकलेला एक हत्ती लालजी वालामध्ये पोहोचला होता. अशीच घटना बुधवारी रात्री दोन वाजता हरिद्वार रेल्वे स्थानकावरही पहायला मिळाली.

  बिल्वकेश्वरकडून एक हत्ती रेल्वे स्थानकात दाखल झाला आणि पाहता पाहता फलाट क्रमांक २ वर ट्रेनची वाट पाहणाऱ्या काही यात्रेकरूंची धावपळ सुरू झाली. प्रवासी घटनास्थळावरून पळ काढू लागले आणि एकच गोंधळ उडाला. प्रवाशांचा आवाज ऐकून आरपीएफ, जीआरपीसह रेल्वे कर्मचारी तेथे पोहोचले. तोपर्यंत गजराज फलाट क्रं. २ च्या रेल्वे रूळावर पोहोचला होता. रेल्वे रुळावरील हत्ती पाहून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. अखेर रेल्वे कर्मचाऱ्यांनी हत्तीला रेल्वे स्थानकातून पळवून लावले. सुमारे एक तास हा थरार रेल्वे स्थानकावर रंगला होता. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही.