राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक; ‘या’ मुद्द्यांवर चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधकांची (Opposition Leader Meeting) बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती दिली जात आहे.

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधकांची (Opposition Leader Meeting) बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती दिली जात आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत विरोधी पक्षातील अनेक महत्त्वाच्या नेतेमंडळींनी उपस्थिती लावली. यामध्ये कपिल सिब्बल, दिग्विजय सिंह यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

केंद्रात भाजपचे अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर आहे. त्यामुळे विविध विषयांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी एकजूट दाखवत बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीची माहिती देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह म्हणाले की, ‘निवडणूक आयोगाने रिमोट ईव्हीएमबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यावेळी रिमोट ईव्हीएमद्वारे निवडणुका घेण्यावर जवळपास सर्वांनीच असहमती व्यक्त केली होती. त्यांना डेमो द्यायचा होता, पण तोही फेटाळण्यात आला. ईव्हीएमबाबत देशात साशंकता आहे’. तसेच कपिल सिब्बल म्हणाले, ‘जेव्हा-जेव्हा ईव्हीएममध्ये बिघाड होतो तेव्हा मत भाजपकडे जाते. हा संभ्रम केवळ राजकीय पक्षांचाच नाही, हा संभ्रम जनतेमध्ये पसरला आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे जाऊन आमच्या प्रश्नांची लेखी उत्तरे मागू, असा निर्णय घेतला आहे’.

ईव्हीएममध्ये छेडछाड करता येऊ शकते

जगातील कोणत्याही यंत्राशी छेडछाड केली जाऊ शकते आणि कोणतेही विज्ञान किंवा कोणताही तज्ज्ञ मशीनमध्ये छेडछाड होत नाही असे म्हणू शकत नाही. त्यामुळे कोणत्याही लोकशाही देशात मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक मशीनचा वापर केला जात नाही.

तृणमूलचे नेते अनुपस्थित

विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या या बैठकीत तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या उपस्थित राहणार असे म्हटले जात होते. मात्र, त्यांनी या बैठकीला पाठ फिरवली. तसेच या बैठकीला तृणमूलचा कोणताही नेता उपस्थित नव्हता. वास्तविक, ईव्हीएमच्या विश्वासार्हतेच्या मुद्द्यावरून ही बैठक बोलावण्यात आली होती.

विविध नेत्यांची उपस्थित

शरद पवार यांच्या घरी शिवसेनेचे नेते अनिल देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह, जेडीयूकडून अनिल हेगडे, डी राजाराम गोपाल यादव, बीआरएसचे केशव राव, सीपायएमचे एल राम करीम यांच्यासह आणखी काही नेते बैठकीसाठी हजर झाले आहेत. या बैठकीत ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.