शरद पवार-अजित पवार भेटीचे मविआत पडसाद; भेटीवर सामनातून ‘गंमत-जंमत’ म्हणून टीका; तर काँग्रेसनं पवारांना सांगितलं, ‘लोकसभेच्या 48 जागा…’

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात झालेल्या भेटीचे पडसाद आता महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) उमटण्यासही सुरुवात झालेली आहे.

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात झालेल्या भेटीचे पडसाद आता महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) उमटण्यासही सुरुवात झालेली आहे. ही भेट कौटुंबिक होती, भाजपसोबत जाण्याचा कोणताही विचार नाही, असं शरद पवार त्यानंतर स्पष्टीकरण देत असले तरी या भेटीनं संभ्रम निर्माण होत असल्याची टीका करण्यात येतेय. वडिलकीच्या नात्यानं भेटू शकत नाही का? असा सवालच शरद पवार यांनी सगळ्यांना केलेला आहे.

    सामनातून भेटींच्या गंमत-जंमतीवर टीका

    शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटी होत आहेत, शरद पवार या भेटी टाळत नाहीत, हे गमतीचे आहे अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलेली आहे. अशा भेटींतून संभ्रम निर्माण होतोय. हा संभ्रम निर्माण व्हावा यासाठीच देशी चाणक्य अजित पवार यांना भाजपकडून पाठवण्यात येते आहे का, अशी शंका उपस्थित करण्यात आली. पवार काका-पुतण्यांच्या या गाठीभेटी गंमत-जंमत ठरत असल्याची टीका करण्यात आली. अजित पवार भाजपसोबत आल्यानं सर्वाधिक गंमत ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची झाली असल्याची टीकाही करण्यात आली.

    पवार काका-पुतण्यांची भेट हा साथीचा आजार आहे. तर मुख्यमंत्री शिंदे आजारी पडून वारंवार विक्षांतीसाठी साताऱ्यात जातात हा मानसिक आजार असल्याची टीका करण्यात आलीय. चार दिवसांपूर्वी अमित शाहा यांच्या पुणे दौऱ्यात राज्यात नेतृत्व बदलाच्या दृष्टीनं खलबतं झाल्याची बातमी फुटल्यानं मुख्यमंत्री शिंदेंचा आजार बळावला आहे, अशी टीकाही करण्यात आलीय. दोन पवारांची भेट आणि मुख्यमंत्र्यांचा आजार हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र, महाराष्ट्र गंमत जंमत नाही, असा इशाराही ठाकरे गटानं दिलेला आहे.

    काँग्रेसनेही दिला राष्ट्रवादीला इशारा

    अजित पवार हे शरद पवारांना एनडीएत येण्यासाठी गळ घालत आहेत, असं राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलंय. शरद पवार यांना केंद्रीय कृषिमंत्री पद आणि नीती आयोगाचे अध्यक्ष अशा ‘ऑफर’ देण्यात आल्याचंही ते म्हणालेत. मात्र, पवारांनी त्या ऑफर स्वीकरल्या नसल्याचंही त्यांनी सांगितलय. त्याचबरोबर मविआत असलेल्या घटक पक्षांनी भाजपसारख्या जातीयवादी पक्षांबाबत खंबीर आणि ठाम भूमिका घेण्याची गरज असल्याचं ते म्हणालेत. अशी भूमिका घेतली नाही तर काँग्रेस महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा लढेल, असा इशाराही चव्हाणांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेला आहे.