राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर विरोधक आखताहेत रणनीती; आता थेट लोकसभा अध्यक्षांविरोधात…

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया दिली जात आहे. त्यात विरोधी पक्ष आता येत्या सोमवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे काँग्रेससह विरोधकांना मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर आता काँग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून (Opposition Leaders) एक विशेष रणनीती आखण्याची तयारी केली जात आहे.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया दिली जात आहे. त्यात विरोधी पक्ष आता येत्या सोमवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची शक्यता आहे. काँग्रेस खासदारांच्या बैठकीत यासंबंधीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. यासंदर्भात काँग्रेस इतर विरोधी पक्षांशी चर्चा करत आहे. बैठकीत विरोधी पक्षांनी संसदेच्या दोन्ही सभागृहातील विरोधकांशी चर्चा करून रणनीती तयार केली. तसेच राहुल गांधी यांच्या अपात्रतेप्रकरणी केंद्राला कोंडीत पकडण्याचा निर्णय घेतला.

बंगला रिकामा करण्याच्या आदेशावर…

विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली. यामध्ये सरकारी बंगला रिकामा करण्याच्या आदेशाबाबत राहुल गांधींना मिळालेल्या पत्रावरही चर्चा झाली. यावर सर्व सदस्यांनी सांगितले की, या आदेशाने काही फरक पडत नाही. कारण आता काँग्रेस आणि राहुल गांधींना कायदेशीर नियमाने जावे लागणार आहे.

लाल किल्ल्यापासून टाऊन हॉलपर्यंत मार्च

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितले की, काँग्रेसचे सर्व खासदार आणि नेते आज सायंकाळी लाल किल्ल्यापासून टाऊन हॉलपर्यंत ‘सेव्ह डेमोक्रसी टॉर्च पीस मार्च’मध्ये सहभागी होतील. येत्या 30 दिवसांत राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांच्या सहभागाने देशभरात ‘जय भारत सत्याग्रह’ आयोजित केला जाईल.