दिल्लीतील आग पीडितांची व्यथा : ‘माझी बहीण जिवंत आहे की नाही, निदान हे तरी सांगा’

सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्यांना मुस्कानचा फोन आला, त्यात मुस्कान म्हणाली की, भीषण आग लागली आहे, या आणि मला वाचवा. इस्माईल पंधरा मिनिटांत घटनास्थळी दाखल झाला. इस्माईलने इमारतीत चढण्याचा प्रयत्न केला, पण तो आत जाऊ शकला नाही.

    नवी दिल्ली – इस्माईल खानची बहीण मुस्कान ही दिल्लीच्या मुंडका येथील त्याच इमारतीत अकाउंटंट होती, जिथे शुक्रवारी संध्याकाळी लागलेल्या आगीत २७ लोकांचा मृत्यू झाला. त्याची बहीण जिवंत आहे की आगीत मरण पावली आहे, हे इस्माईलला अजूनही कळू शकलेले नाही. आपल्या बहिणीच्या शोधात त्यांनी जवळपासच्या प्रत्येक हॉस्पिटलचा १५ तास शोध घेतला.

    सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्यांना मुस्कानचा फोन आला, त्यात मुस्कान म्हणाली की, भीषण आग लागली आहे, या आणि मला वाचवा. इस्माईल पंधरा मिनिटांत घटनास्थळी दाखल झाला. इस्माईलने इमारतीत चढण्याचा प्रयत्न केला, पण तो आत जाऊ शकला नाही.

    क्रेनच्या मदतीने इमारतीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढत असल्याचे इस्माईलने पाहिले, इस्माईलला आशा होती की त्याची बहीण देखील बाहेर येईल, परंतु जो कोणी इमारतीतून सुखरूप बाहेर आला, त्यात त्याची बहिण नव्हती. इस्माईल रात्रभर संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटल, सफदरजंग हॉस्पिटल, राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये फेऱ्या मारत राहिला. त्यांचा शोध सुरूच आहे.

    १३ मे रोजी दिल्लीतील मुंडका येथे एका चार मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत २७ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत या २७ जणांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. या इमारतीत काम करणाऱ्यांचे नातेवाईक अपघातस्थळ व रुग्णालयाबाहेर भटकत आहेत.

    सुमारे डझनभर कुटुंबांना त्यांची बहीण, वहिनी, भाची, मेव्हणी अजूनही कुठे आहेत, याचा पत्ताच लागलेला नाही. जिवंत किंवा मृत. या इमारतीत सीसीटीव्ही कॅमेरे बनवण्याचे काम करण्यात येत होते. यामध्ये बहुतांश महिला काम करत होत्या. आगीत सर्वाधिक बळी महिलांचाही आहे.