खूशखबर! येत्या काही दिवसांत पेट्रोल, डिझेल होणार स्वस्त! ; कच्च्या तेलाच्या दरात घट

अनेक देशात कोरोना बाधितांची संख्या वाढल्याचे यामागे मुख्य कारण आहे. युरोपातील काही देशांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनसारखे निर्णय घेतले आहेत व पुढेही कठोर निर्बंध लादण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रूडवर दबाव वाढण्याचीही शक्यता आहे.

    दिल्ली : सद्यस्थितीत पेट्रोल – डिझेलचे दर आकाशाला भिडले असले तरी लवकरच सामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या १५ दिवसात कच्च्या तेलाच्या दरात १० टक्के घसरण झाली आहे. युरोपमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली असून इंधनाच्या मागणीत घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच कच्च्या तेलाच्या किमती ७१ डॉलर प्रति बॅरलवरून घसरून ६४ डॉलर प्रति बॅलरवर आल्या आहेत.

    दोन आठवड्यापासून घसरण

    ओपेक प्लस देशांनी उत्पादनात कपात करण्याचा निर्णय कायम ठेवला होता. त्यामुळे ब्रेंट क्रूडचे दर ७० डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले होते. परंतु गेल्या दोन आठवड्यात क्रूडमध्ये मोठी घट झाली आहे. अनेक देशात कोरोना बाधितांची संख्या वाढल्याचे यामागे मुख्य कारण आहे. युरोपातील काही देशांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनसारखे निर्णय घेतले आहेत व पुढेही कठोर निर्बंध लादण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रूडवर दबाव वाढण्याचीही शक्यता आहे.