पंतप्रधान मोदींना ‘पाकिस्तानी’ बहीण बांधणार राखी; तीन वर्षांनंतर पाकिस्तान वंशाची महिला येणार भारतात

भारत आणि पाकिस्तानमधील संबंधामध्ये (Bharat-Pakistan Relation) आपुलकी हा शब्द तसा दुर्मीळच आहे. मात्र, आता रक्षाबंधनानिमित्त दोन्ही देशांतील आपुलकीचे नाते सर्वांना पाहायला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना तीन वर्षांनंतर पाकिस्तान वंशाच्या त्यांच्या बहीण कमर मोहसीन शेख राखी बांधणार आहेत.

    नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील संबंधामध्ये (Bharat-Pakistan Relation) आपुलकी हा शब्द तसा दुर्मिळच आहे. मात्र, आता रक्षाबंधनानिमित्त दोन्ही देशांतील आपुलकीचे नाते सर्वांना पाहायला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना तीन वर्षांनंतर पाकिस्तान वंशाच्या त्यांच्या बहीण कमर मोहसीन शेख राखी बांधणार आहेत. कोरोना साथीमुळे गेली तीन वर्षे कमर मोहसीन शेख यांना पंतप्रधान मोदी यांना प्रत्यक्ष भेटून राखी बांधता आली नव्हती.

    कमर मोहसीन शेख या मूळच्या पाकिस्तानी वंशाच्या आहेत. विवाहानंतर त्या भारतात आल्या. गेल्या 30 वर्षांपासून त्या नरेंद्र मोदी यांना राखी बांधतात. दरवर्षी त्या स्वतःच्या हाताने राखी बनवतात. कमर मोहसीन शेख यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोरोनामुळे मागील दोन ते तीन वर्ष राखी बांधता आली नाही. त्यावेळी मी त्यांना राखी पोस्ट केली होती; पण यंदा रक्षाबंधनावेळी मी त्यांना वैयक्तिक भेटून राखी बांधणार आहे. यासाठी त्यांनी स्वतःच्या हाताने राखी तयार केली आहे.

    …तेव्हा मोदी आरएसएसचे स्वयंसेवक होते

    आपल्या पहिल्या रक्षाबंधनाची आठवण करून देताना कमर शेख म्हणाल्या की, जेव्हा मी प्रथम नरेंद्र मोदी यांना राखी बांधली होती. तेव्हा ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) कार्यकर्ते होते. त्यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी मी प्रार्थना केली होती. गुजरातचे मुख्यमंत्री झाले. यानंतर मी राखी बांधली तेव्हा तुम्ही पंतप्रधान व्हावे, अशी प्रार्थना करेन, असे मी म्हटले होते. यावर नरेंद्र मोदी हसत म्हणत होते की, ‘तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील’. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा मला खूप आनंद झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी प्रशंसनीय काम करत आहेत’.