pm narendra modi

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पदाच्या कार्यकाळात अनेक मोठे निर्णय घेतले. त्यामुळे भ्रष्टाचार आणि इतर गैरमार्गाने पैसे साठवणाऱ्यांना चांगलाच दणका बसला.

  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज सरकारच्या कार्यकाळाची 9 वर्षे पूर्ण करत आहेत. या मागील नऊ वर्षांमध्ये पंतप्रधान म्हणून मोदींनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्यातील काही निर्णयाची देशातच नाही तर परदेशातही चांगलीच चर्चा झाली. तसेच देशातील अनेक भागांत मोदींच्या नेतृत्वात भाजपला (BJP Success) विशेष असं यश मिळालंय. त्यामुळेच पंतप्रधान मोदींचे नाव देशातील नव्हे तर जगभरातील शक्तिशाली नेत्यांमध्ये घेतले जाते.

  पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पदाच्या कार्यकाळात अनेक मोठे निर्णय घेतले. त्यामुळे भ्रष्टाचार आणि इतर गैरमार्गाने पैसे साठवणाऱ्यांना चांगलाच दणका बसला.

  2016 मध्ये नोटाबंदी

  पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सर्वात मोठा निर्णय 2016 मध्ये नोटबंदी करून घेतला. या निर्णयाने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले आणि मध्यरात्री 12 वाजता 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. सरकारच्या अचानक नोटा बंद करण्याच्या निर्णयाने देशभरात खळबळ उडाली आहे. मोदी सरकारने नोटाबंदीच्या माध्यमातून काळ्या पैशाला लगाम लावण्यासाठी हा निर्णय घेतला होता.

  GST ची केली अंमलबजावणी

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने 1 जुलै 2017 पासून देशभरात जीएसटी लागू केला. देशात ‘एक देश, एक कर’ ही प्रणाली लागू करणे हा जीएसटी लागू करण्याचा उद्देश होता. जीएसटी लागू झाल्यानंतर सेवा कर, व्हॅट, खरेदी कर, उत्पादन शुल्क आणि इतर अनेक कर रद्द करण्यात आले.

  मोदींच्या नेतृत्वात निवडणुकांमध्ये यश

  2014 नंतर ईशान्येकडील राज्यांमध्ये भाजपचा विस्तार झाला. एप्रिल 2016 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप पहिल्यांदा सत्तेवर आले. अरुणाचल प्रदेशातही भाजपने सरकार स्थापन केले. पंतप्रधान मोदींनी येथे जोरदार प्रचार केला. त्रिपुरामध्ये सलग दुसऱ्यांदा भाजपचे सरकार आहे. केंद्रात सत्तेवर आल्यानंतर भाजपने येथील डाव्यांचे वर्चस्व संपुष्टात आणले. नागालँड, मेघालय, मणिपूरमध्येही भाजपचे युतीचे सरकार आहे.

  एअर स्ट्राईकची कारवाई

  14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्याला लक्ष्य केले होते. त्यावेळी सीआरपीएफच्या 78 गाड्यांचा ताफा जम्मूहून श्रीनगरला जात होता. या ताफ्यात सुमारे 2500 सैनिक होते. त्यावेळी एका दहशतवाद्याने सीपीआरएफच्या ताफ्यात स्फोटके घेऊन जाणाऱ्या वाहनाला धडक दिली. या स्फोटात 40 जवान शहीद झाले होते. दोन आठवड्यांनंतर, 26 फेब्रुवारी 2019 रोजी, भारताने बालाकोट हवाई हल्ला केला आणि जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना ठार केले.

  जम्मू-काश्मीरमधून हटवले कलम 370

  जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला होता. हा निर्णय म्हणजे सर्वात मोठे यश आहे. 5 ऑगस्ट 2019 रोजी, जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणार्‍या घटनेतील कलम 370 मधील बहुतांश कलमे रद्द करण्यात आली.