अमेरिकन विद्यापीठात कृपाण परिधान केलेल्या विद्यार्थ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, कृपाण काढतानाचा व्हिडिओ व्हायरल

दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल होताच शीख धर्माच्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अमेरिकन पोलिस अधिकाऱ्याच्या अशा वागणुकीचा शीख समुदायाने तीव्र निषेध केला आहे.

    अमेरिका : अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठात एका शीख विद्यार्थ्यासोबत पोलिसांनी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. एक अमेरिकन पोलीस अधिकारी एका शीख तरुणाकडून कृपाण काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा पोलिस अधिकारी त्याच्याकडून कृपाण घेण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा त्या  तरुणाने पोलिस अधिकाऱ्याला सांगितले की हे त्याच्या धर्माचं प्रतिक आहे, तो ते काढू शकत नाही. यानंतर त्या पोलीस अधिकाऱ्याने स्वतः शीख विद्यार्थ्याने घातलेली कृपाण काढण्याचा प्रयत्न सुरू केला. यावर त्या  तरुणाने अतिशय नम्रपणे म्हणाले की, याला हात लावू नका. पण कृपाण काढली नाही तर हातकड्या घालाव्या लागतील, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल होताच शीख धर्माच्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अमेरिकन पोलिस अधिकाऱ्याच्या अशा वागणुकीचा शीख समुदायाने तीव्र निषेध केला आहे. तर, दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनीही व्हिडिओ ट्विट करून याचा तीव्र निषेध केला आहे. 

    दरम्यान  भारतीय जनता पक्षाचे नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत दावा केला आहे की, शार्लोट येथील नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातील एका शीख विद्यार्थ्याला कृपाणपरिधान केल्याबद्दल कॅम्पसमध्ये कथितपणे ताब्यात घेण्यात आले होते. मनजिंदर सिंग सिरसा यांनी ट्विटरवर या प्रकरणाचा व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे.