राजस्थानात राजकारण तापलं; माजी विधानसभा अध्यक्ष कैलाश मेघवाल यांना भाजपमधून केलं निलंबित

'हिरो होतो, आता झिरो झालो' वर्षअखेरीस होत असलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच राजस्थान भाजपमध्ये वाद उफाळून आला आहे. भाजपने पक्षातील ज्येष्ठ नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष कैलाश मेघवाल (Kailash Meghwal) यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वापासून निलंबित केले आहे.

    जयपूर : ‘हिरो होतो, आता झिरो झालो’ वर्षअखेरीस होत असलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच राजस्थान भाजपमध्ये वाद उफाळून आला आहे. भाजपने पक्षातील ज्येष्ठ नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष कैलाश मेघवाल (Kailash Meghwal) यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वापासून निलंबित केले आहे.

    मेघवाल हे गेल्या काही काळापासून सातत्याने केंद्रीयमंत्री अर्जुनराम मेघवाल (Arjunram Meghwal) यांच्यावर टीका करत होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी अर्जुनराम मेघवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर बुधवारी जयपूरमध्ये आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी भाजपमध्ये गटबाजी असल्याचा दावाही केला होता. त्यानंतर पक्षाने त्यांच्यावर तडकाफडकी निलंबनाचा बडगा उगारला. मेघवाल हे वसुंधरा राजे गटातील नेते मानले जातात.

    ‘कधीकाळी मी हिरो होतो. आता झिरो झालो आहे. पक्षामध्ये माझ्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. माझ्या पक्षातील काही लोक अर्जुनराम मेघवाल यांची तुलना डॉ. आंबेडकर यांच्याशी करत आहेत. हे केवळ त्यांचं महिमामंडन करण्यासाठीच केले जात आहे. राजकारणात सक्रिय होतो आणि यापुढेही राहीन. वसुंधरा राजे यांच्यावर कुठलाही आरोप कधीही केलेला नाही’.

    – कैलाश मेघवाल, माजी विधानसभा अध्यक्ष