राष्ट्रपती निवडणूक : रालोआला बळकटी, ममतांची बैठक

    भाजप(BJP)ने राज्यसभेच्या ५७ जागांपैकी अनपेक्षितरित्या स्वत:च्या २२ जागा आणि एका अपक्षाचा विजय निश्चित केल्याने राष्ट्रपती निवडणुकी(Presidential Election)आधी राष्ट्रीय लोकशाही आघाडी(NDA)ची स्थिती आणखी बळकट केली आहे. राज्य विधानसभांतील (Rajya Sabha) संख्याबळानुसार भाजपला ५७ पैकी २० जागा मिळायला हव्या होत्या. मात्र, त्या पक्षाने २२ जागा जिंकल्या. राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्यांमध्ये त्यांचे २५ सदस्य आहेत. काँग्रेसने ९ जागा जिंकल्या असून त्यांचे ७ सदस्य निवृत्त होत आहेत.

    राज्यसभेत भाजपच्या जागा ९५ वरून घटून ९२ आणि काँग्रेसच्या २९ वरून ३१ होतील. राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्र, कर्नाटक आणि हरियाणातील विरोधकांचा थेट फायदा भाजपला मिळाला आहे. या तीन राज्यांशिवाय राजस्थानमध्येही भाजपने अपक्षांसह आपले उमेदवार उतरवले होते. राजस्थान वगळता तीन ठिकाणी त्याचा फायदा मिळाला. हरियाणात काँग्रेसला पुन्हा झटका बसला आहे. येथून पक्षाचे उमेदवार अजय माकन यांचा किरकोळ फरकाने पराभव स्वीकारावा लागला.

    राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांची दिल्लीत बैठक बोलावली आहे. नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये १५ जून रोजी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्व प्रगतिशील विरोधी शक्तींनी रणनीती ठरवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिले आहे.