पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक, जम्मूमधील हल्ल्यासह विविध विषयांवर चर्चा होण्याचे संकेत

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सायंकाळी ४ वाजता उच्चस्तरीय बैठक(Prime Minister Narendra Modi Called High Level Meeting) बोलावली आहे. या बैठकीत गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत.

    दिल्ली : दहशतवाद्यांनी ड्रोनचा वापर करून रविवारी पहाटे जम्मू विमानतळावरील भारतीय हवाई दलाच्या तळावर बॉम्बहल्ला(Bombblast In Jammu) केला. या स्फोटात हवाई दलाचे २ अधिकारी जखमी झाले. या प्रकरणाची केंद्राने गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सायंकाळी ४ वाजता उच्चस्तरीय बैठक(Prime Minister Narendra Modi Called High Level Meeting) बोलावली आहे. या बैठकीत गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत.

    या बैठकीचा अनेक विषयांवर चर्चा होऊ शकते, अशी माहिती मिळाली आहे. देशाच्या सुरक्षेशी संबंधित अनेक बडे अधिकारीही या बैठकीत भाग घेतील. तसेच जम्मू-काश्मीरमधील हवाई दलाच्या तळावर झालेल्या हल्ल्याबद्दलही चर्चा होऊ शकते. हवाई दलाच्या तळावर हल्ला झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील सर्व सुरक्षा संस्था सतर्क करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

    रातनुचाक—कालुचाक लष्करी भागात सोमवारी दोन ड्रोन्सवर लष्कराच्या जवानांनी सतर्कता दाखवत गोळीबार केला. रविवारी रात्री ११.४५ वाजता पुन्हा एक ड्रोन विमान हद्द ओलांडून आले होते. त्यानंतर दुसरे ड्रोन पहाटे २.४० वाजता आले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तेथे उपस्थित सैनिकांनी गोळीबार करताच ही दोन्ही ड्रोन विमाने माघारी गेली.

    गेल्या आठवड्याभरापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत होणाऱ्या काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. जम्मू-काश्मीरची विभागणी केल्यानंतर आणि कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान या सर्वपक्षीय नेत्यांना भेटत होते. या बैठकीमध्ये अपेक्षेप्रमाणेच सर्वच पक्षांच्या नेत्यांनी काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. यासोबतच, विधानसभा निवडणुका, काश्मिरी पंडितांचं पुनर्वसन, राजकीय कैद्यांची सुटका अशा काही प्रमुख मागण्या या पक्षांकडून करण्यात आल्या.