गुजरातमध्ये शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या प्रदर्शनास विरोध; VHP आणि बजरंग दलाने दिला ‘हा’ इशारा

    मुंबई : शाहरुख खान याचा पठाण चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. हिंदी संघटनांकडून या चित्रपट दाखवलेल्या काही दृश्यांवर आक्षेप व्यक्त कला जात असून याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचे बोलले जात आहे. ठिकठिकाणी याविषयी निदर्शने देखील करण्यात आली असून आता गुजरातमध्ये पठाण चित्रपटाच्या प्रदर्शनास बंदी घालण्याची मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्याकडून केली जात आहे. तसेच थिएटर मालकाने हा चित्रपट त्यांच्या थिएटरमध्ये दाखवल्यास तेथे होणाऱ्या हिंसाहारासाठी थिएटर चालक जबाबदार असेल असे देखील सांगण्यात आले आहे.

    विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांचे म्हणणे आहे की, “भगव्याला अश्लीलतेशी जोडून चित्रपटाच्या गाण्याचे नाव ‘बेशरम रंग’ असे ठेवण्यात आले आहे. हे गाणे बॉलीवूडची विकृत हिंदूविरोधी मानसिकता दाखवते. ही दृश्ये असलेला चित्रपट आम्ही गुजरातमध्ये (Gujrat) प्रदर्शित होऊ देणार नाही”.

    पठाण (Pathan) चित्रपटावरून का होतोय वाद?

    पठाणच्या ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. भगवा रंग हा हिंदू धर्माचे प्रतीक असल्याचे काही सोशल मीडिया वापरकर्ते सांगत आहेत आणि दीपिका या रंगाचा पोशाख घालून ‘बेशरम रंग’ या गाण्यावर नाचत आहे, जे अत्यंत आक्षेपार्ह आहे. बिकिनीसाठी भगव्यासारखा पवित्र रंग वापरणे मान्य नसल्याचे बहिष्कारकर्त्यांचे मत आहे.