
ऋषी सुनक यांनी आपल्या देशाच्या छोट्या भेटीदरम्यान भारतातील काही मंदिरांना भेट देण्याची आशाही व्यक्त केली.
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak ) हे G20 शिखर परिषदेसाठी ( G20 Summit) भारतात आले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांना हिंदू धर्मावर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते उत्साहाने म्हणाले की ‘I am a Proud Hindu’, मला हिंदू असल्याचा अभिमान वाटतो. तसेच त्यांनी या भारत भेटीदरम्यान भारतातील काही मंदिरांना भेट देण्याची आशाही व्यक्त केली.
काय म्हणाले ऋषी सुनक
ऋषी सुनक यांना भारतातील सण आवडत असल्याचे ते म्हणाले. रक्षाबंधनाला किती राख्या आल्या होत्या. तो सण मी माझ्या बहिणींसोबत साजरा केला. मात्र जन्माष्टी साजरी करण्याची संधी मिळाली नाही. मला आशा आहे की मी ते देखील साजरे करू शकेन.
तसेच, पंतप्रधान ऋषी सुनक यांनीही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरेच काही सांगितले. ते म्हणाले की, माझे लग्न बेंगळुरूमध्ये झाले आहे, मला ते ठिकाण खूप आवडते. माझे कुटुंब येथे राहते, मला भारतात येऊन खूप आनंद होत आहे, मला खूप विशेष वाटत आहे. ऋषी सुनक यांनी भारताच्या संस्कृतीचेही कौतुक केले आहे, यासोबतच त्यांनी यूकेमध्ये डोके वर काढणाऱ्या खलिस्तानी समर्थकांवरही मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, कोणत्याही प्रकारच्या अतिरेकी शक्तींना उठण्याची संधी देऊ नये. आम्ही भारतासोबत एकत्र काम करत आहोत, यावरही मात केली जाईल.