rahul gandhi in surat court

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी 2019मध्ये राहुल गांधी यांनी म्हटलं होतं की, “सगळ्या चोरांचं नाव मोदी कसं असतं ?” त्या वक्तव्यानंतर हा खटला दाखल करण्यात आला. सूरतच्या सीजेएम कोर्टाने आज 11 वाजता मोदी आडनावावरून मानहानी करण्याच्या प्रकरणात राहुल गांधी यांना दोषी ठरवलं.

सूरत: मोदी आडनावावरून (Modi Surname Row) विनोद करणं राहुल गांधी यांना चांगलंच भोवलं आहे. सूरत कोर्टाने (Surat Court) मोदी आडनावाच्या मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधी यांना दोषी (Rahul Gandhi Guilty) ठरवलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी 2019मध्ये राहुल गांधी यांनी म्हटलं होतं की, “सगळ्या चोरांचं नाव मोदी कसं असतं ?” त्या वक्तव्यानंतर हा खटला दाखल करण्यात आला. सूरतच्या सीजेएम कोर्टाने आज 11 वाजता मोदी आडनावावरून मानहानी करण्याच्या प्रकरणात राहुल गांधी यांना दोषी ठरवलं.

कोर्टात आज राहुल गांधी यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल त्यांचं मत विचारण्यात आलं. तेव्हा ते म्हणाले की, “मी नेहमी भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलत असतो. मी कुणाचा जाणून बुजून अपमान केलेला नाही. या वक्तव्यामुळे कुणाचं नुकसान झालेलं नाही”.

राहुल गांधी दोषी, शिक्षा काय होणार ?
आज सकाळी पावणे अकराच्या सुमारास राहुल गांधी सूरतच्या जिल्हा व सत्र न्यायालयात पोहोचले. त्यानंतर कोर्टाने या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात केली. राहुल गांधी यांच्या विरोधातला हा मानहानीचा खटला कलम 499 आणि 504 नुसार दाखल करण्यात आला होता. आयपीसीच्या कलम 504 नुसार राहुल गांधी यांना दोषी ठरवण्यात आल्यास दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते. कोर्टाने राहुल गांधी यांना दोषी ठरवलं. राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यांना उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी 30 दिवसांचा अवधी देत शिक्षा स्थगित करण्यात आली आहे.

राहुल गांधींचा ‘शेर ए हिंदुस्तान’ असा उल्लेख
राहुल गांधी जेव्हा सूरत एअरपोर्टवर आले तेव्हा त्यांच्या समर्थकांकडून त्यांचं पोस्टर लावत जंगी स्वागत करण्यात आलं. कडक सुरक्षा व्यवस्थेत ते कोर्टात रवाना झाले. त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या पोस्टरमध्ये त्यांचा उल्लेख ‘शेर ए हिंदुस्तान’ असा करण्यात आला होता. काही पोस्टरवर ‘काँग्रेस झुकणार नाही’, असा संदेशदेखील लिहिण्यात आला होता.

काय आहे प्रकरण?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी 2019मध्ये राहुल गांधी यांनी कर्नाटकातील कोलार इथे म्हटलं होतं की, “सगळ्या चोरांचं आडनाव मोदी कसं काय असतं ?” राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर सूतरमधील भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींच्या विरोधात खटला दाखल केला. राहुल गांधींनी मोदी समुदायाचा अपमान केला असल्याचा त्यांनी आरोप केला. ही केस नंतर सूरत कोर्टात आली. राहुल गांधींना 9 जुलै 2020 ला सूरतच्या कोर्टात हजर व्हावं लागलं होतं. पूर्णेश मोदी यांनी या प्रकरणाचा लवकर निकाल लावण्याची मागणी गुजरात कोर्टाकडे गेल्या महिन्यात केली होती. त्यानंतर सूरत कोर्टाने या प्रकरणाचा निकाल लावला आहे.