बिहारच्या बक्सरमध्ये रेल्वे अपघात, नॉर्थ ईस्ट एक्स्प्रेस रुळावरून घसरली; आत्तापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू

बिहारमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बिहारच्या बक्सरमध्ये बुधवारी रात्रीच्या सुमारास रेल्वेचा भीषण अपघात झाला. दिल्लीहून गुवाहाटीला जाणाऱ्या नॉर्थ-इस्ट एक्सप्रेसचे तब्बल २१ डब्बे रुळावरुन घसरले.

  बिहारमधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बिहारच्या बक्सरमध्ये बुधवारी रात्रीच्या सुमारास रेल्वेचा भीषण अपघात झाला. दिल्लीहून गुवाहाटीला जाणाऱ्या नॉर्थ-इस्ट एक्सप्रेसचे तब्बल २१ डब्बे रुळावरुन घसरले. या भीषण अपघातात आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर शेकडो प्रवासी जखमी झाले आहेत.

  मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

  जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघाताची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

  आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू

  मिळालेल्या माहितीनुसार, नॉर्थ-इस्ट एक्सप्रेस राजधानी दिल्लीच्या आनंद विहार स्टेशनवरून गुवाहाटीच्या कामाख्या स्टेशनकडे निघाली होती. ट्रेन बिहारच्या बक्सर जिल्ह्यात आली असता, दानापूर विभागातील रघुनाथपूर स्टेशनजवळ दोन एसी डब्यांसह २१ डबे रुळावरुन घसरले. या भीषण अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, या दुर्घटनेत आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

  रेल्वेमंत्र्यांनी घेतला आढावा

  बक्सर लोकसभा मतदारसंघांतर्गत रघुनाथपूर रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघाताबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ही घटना दुःखद असल्याचे सांगून केंद्रीय मंत्री म्हणाले की, मदतकार्य सुरू करण्यात आले आहे, असंही त्यांनी सांगितलं. तर, दुर्घटनेनंतर स्थानिक लोकही मदतीला आले आहेत.