चेन्नईकडून चिन्नास्वामीवर धावांचा पाऊस, कॉनवे-दुबेची तुफान फटकेबाजी; चेन्नई सुपर किंग्सचे बंगळुरूसमोर २२७ धावांचे आव्हान

चेन्नईने धुव्वाधार फलंदाजी करत कॉनवे-शिवमच्या अर्धशतकांमुळे चेन्नईने बंगळुरूसमोर २२७ धावांचे आव्हान ठेवले.

    आयपीएलच्या २४व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध होत आहे. दोन्ही संघ सोमवारी (१७ एप्रिल) बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आमनेसामने आहेत. चेन्नईचा या मोसमातील हा पाचवा सामना आहे. आतापर्यंत त्याने दोन सामने जिंकले असून दोन सामने गमावले आहेत. त्याचवेळी आरसीबीने चारपैकी दोन सामने जिंकले आहेत. चेन्नईने धुव्वाधार फलंदाजी करत कॉनवे-शिवमच्या अर्धशतकांमुळे चेन्नईने बंगळुरूसमोर २२७ धावांचे आव्हान ठेवले.

    बंगळुरूच्या चिन्नास्वामी मैदानावर फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या चेन्नई संघाची सुरूवात अत्यंत निराशाजनक झाली. वेगवान गोलंदाज मोहमद सिराजने डावाच्या तिसऱ्याच षटकात ऋतुराज गायकवाडला माघारी पाठवलं. गायकवाड केवळ ३ धावा काढून बाद झाला.

    त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या अजिंक्य रहाणेने कॉनवेच्या साथीने आरसीबीच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांनी मिळून दुसऱ्या विकेट्साठी ७४ धावांची भागीदारी केली. अजिक्य रहाणे ३७ धावा काढून बाद झाला. आपल्या सुंदर खेळीत त्याने ३ षटकार आणि २ चौकार लगावले.

    रहाणे बाद झाल्यानंतर शिवम दुबे मैदानावर आला. त्याने कॉनवेच्या साथीने चेन्नईचा डाव पुढे नेला. सुरूवातीला सावध फलंदाजी केल्यानंतर ऐनवेळी दुबेने रौद्ररुप धारण केलं. त्याला कॉनवेची सुद्धा चांगली साथ मिळाली. दोघांनी तिसऱ्या विकेट्साठी १०८ धावा जोडल्या. वेन पार्नेलने दुबेला बाद करत ही जोडी फोडली.

    दुबेने २७ चेंडूत ५२ धावा चोपल्या. यात त्याने ५ षटकार आणि २ चौकार ठोकले. दुसरीकडे कॉनवे शतकाकडे वाटचाल करत असताना हर्षल पटेलने त्याला क्लीन बोल्ड केलं. कॉनवेने ४५ चेंडूत ८३ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याने ६ चौकार आणि ६ षटकारांची आतिषबाजी केली. शेवटच्या काही षटकात शेवटच्या काही षटकात अंबाती रायडू आणि मोईन अलीने आक्रमक खेळी करत चेन्नईला २०० चा टप्पा पार करून दिला.