संसदेत गदारोळ! BJP म्हणते महाराष्ट्राचे गृहमंत्री करतायेत वसुली, शरद पवार म्हणतात-वाझे आणि गृहमंत्र्यांची भेटच झाली नाही

संसदेच्या दोन्ही सभागृहात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणावरून गदारोळ झाला. या दरम्यान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्यसभेत हा मुद्दा उपस्थित केला आणि म्हणाले की, गृहमंत्री वसुली करत आहेत आणि हे सर्व देश पाहतोय.

  नवी दिल्ली : संसदेत भारतीय जनता पार्टी (BJP) च्या खासदारांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासोबतच उद्धव ठाकरे सरकारही बरखास्त करण्याची मागणी केली.

  जावडेकर यांनी प्रश्नउत्तरांच्या कालावधीत देशमुख यांच्यावर वसुली करत असल्याचा आरोप केला आणि दावा केला की, महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्यात येत आहे. ते म्हणाले की, प्रथम दहशतवादी कारमध्ये बॉम्ब ठेवत होते, पण आता हे काम पोलीस करत आहेत. यानंतर राज्यसभेत गदारोळ झाला. तथापि, गदारोळानंतर अध्यक्षांनी स्पष्ट केलं की, कामकाजात याची नोंद होणार नाही. गदारोळामुळे राज्यसभा दुपारी २ पर्यंत स्थगित करण्यात आली.

  राज्यसभेसोबतच लोकसभेतही याच मुद्द्यावरून गदारोळ झाला. भाजपचे जबलपूरचे खासदार राकेश सिंह लोकसभेत म्हणाले की, देशाच्या इतिहासातील बहुधा ही पहिलीच घटना असावी जेव्हा एका भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याला वाचविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली.
  सिंह यांनी दावाही केला की, या अधिकाऱ्याला १०० कोटी रुपयांच्या दररोजच्या वसुलीचे टार्गेट देण्यात आले होते. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी स्वत: आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास करायला हवा.

  देशमुख यांच्या समर्थनासाठी शरद पवार पुन्हा मैदानात :

  दिल्लीत सोमवारी राष्ट्रलादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली, ज्यात त्यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचा बचाव केला. ते म्हणाले, फेब्रुवारीमध्ये वाझे आणि देशमुख यांची भेट झालीच नव्हती. देशमुख त्यावेळी रुग्णालयात दाखल होते. रविवारीही शरद पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती, यात ते म्हणाले की, हा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतला आहे.

  महाविकास आघाडी (मविआ) सरकारकडे “उत्तम प्रकारचे” बहुमत आहे आणि फक्त एका अधिकाऱ्यामुळे सरकार पडणार नाही असं शिवसेनेने म्हटलं आहे. तथापि, मुंबई पोलीसचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमुळे मंत्रालयाची प्रतिमा मलीन झाली आहे असं मतही शिवसेनेने व्यक्त केलं आहे.

  शिवसेनेने असंही म्हटलं आहे की, पक्षप्रणित सरकारसाठी हा मुद्दा “प्रतिष्ठेचा प्रश्न” बनला आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने एक दिवस आधी देशमुख यांचा राजीनामा घेण्याची शक्यता नाकारली होती.

  शिवसेनेचे मुखपत्र सामनामधील संपादकीयात पक्षाने म्हटले आहे की, जर महाविकास आघाडी सरकारने मिळविलेले बहुमत कमी करण्याचा प्रयत्न भाजपने केला तर याचा भडका उडेल. महाविकास आघाडी सरकार हे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे सरकार आहे.

  परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेल्याच आठवड्यात पत्र लिहून दावा केला होता की, देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांना १०० कोटी रुपयांची मासिक वसुली करण्यासाठी सांगण्यात आलं आहे. या पत्रानंतर राज्यात राजकीय वादळ आलं होतं. सिंग यांची अलीकडेच मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती.