पीएम केअर फंडाच्या विश्वस्तपदी रतन टाटा; सल्लागार समितीचीही नेमणूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पीएम केअर फंडच्या नवीन विश्वस्त मंडळ आणि सल्लागार समितीसोबत बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. या बैठकीत नवे ट्रस्टी अर्थात विश्वस्तांशिवाय (PM Cares Fund Trustees) पीएम केअर फंडाच्या सल्लागार समितीचीही नेमणूक करण्यात आली.

    मुंबई : उद्योजक रतन टाटा (Ratan Tata) यांची केंद्र सरकारकडून पीएम केअर फंडाच्या (PM Cares Fund) विश्वस्तपदावर (Trustees) नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाने याबाबत निवेदन जारी केले आहे. पीएम केअर फंडाच्या विश्वस्तपदी रतन टाटा यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश के.टी.थॉमस, लोकसभेचे माजी उपसभापती करिया मुंडा यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पीएम केअर फंडच्या नवीन विश्वस्त मंडळ आणि सल्लागार समितीसोबत बैठक पार पडली. या बैठकीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. या बैठकीत पीएम केअर फंडातर्फे चालवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली. या बैठकीत नवे ट्रस्टी अर्थात विश्वस्तांशिवाय पीएम केअर फंडाच्या सल्लागार समितीचीही नेमणूक करण्यात आली. यामध्ये कॅगचे माजी अध्यक्ष राजीव महर्षी (Rajiv Mehrishi), इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्षा सुधा मूर्ती (Sudha Murty) आणि इंडिया कॉर्प्स आणि पिरामल फाउंडेशनचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आनंद शाह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन विश्वस्त आणि सल्लागार समितीमधील सदस्यांचे स्वागत केले. या सदस्यांचा अनुभव पीएम केअर फंडासाठी लाभदायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. नवीन विश्वस्त आणि सल्लागार समितीच्या सदस्यांमुळे पीएम केअर्स फंडाच्या कामकाजाला व्यापक दृष्टीकोन मिळेल. या सदस्यांचा सार्वजनिक जीवनातील अनुभव पीएम केअर फंड जनतेच्या विविध गरजांसाठी फायदेशीर ठरण्यास मदत होईल. नवीन विश्वस्तांच्या पंतप्रधान मोदींसोबत पार पडलेल्या बैठकीत विश्वस्तांनी कोरोनाकाळातील पीएम केअर फंडांच्या कामांचे कौतुक केले.