भाजपच्या विजयासाठी रवींद्र जाडेजाचे मतदारांना आवाहन

    जामनगर : गुजरात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून आता प्रत्येक पक्ष हा प्रचारासाठी मैदानात उतरला आहे. भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जाडेजा याची पत्नी रिवाबा जाडेजा हिला भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी तिकीट मिळाले असून ती जामनगर येथून विधानसभेची निवडणूक लढवत आहे. पत्नी रिवाबा आणि भाजपच्या प्रचारासाठी रवींद्र जाडेजा प्रचारात उतरला आहे. तो पत्नी रिवाबा सह अनेक प्रचार सभा तसेच विविध कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत आहे. अशातच क्रिकेटपटू रवींद्र जाडेजाने जामनगरवासियांना भाजपला निवडून देण्याचे आवाहन केले आहे.

    रवींद्र जडेजाने ट्विटच्या माध्यमातून देखील “जामनगरवासियांनो भाजपला प्रचंड बहुमतांनी विजयी करा” असे ट्वीट करून फोटो शेअर केला आहे. गुजरात विधानसभेच्या सर्व १८२ जागांसाठी १ डिसेंबर आणि ५ डिसेंबरला, दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात ८९ जागांवर मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांवर मतदान होणार आहे. ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. जाडेजाचे कुटुंब यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राजकारणाच्या केंद्र स्थानी आले आहे. रवींद्र जाडेजाची पत्नी रिवाबा या जामनगर मधून भाजपच्या उमेदवार असून तर रवींद्र जडेजाची मोठी बहीण नैना जाडेजा या जामनगरमध्ये गुजरात महिला काँग्रेसच्या महामंत्री आणि जामनगरच्या स्टार प्रचारक आहेत.