आठ महिन्यांपासून ‘तो’ चालतोय पायी; घ्यायचेय 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन

पंजाबचे रितिक सक्सेना (Ritik Saxena) हातात तिरंगा घेऊन 12 ज्योतिर्लिंगांचे पायी दर्शन घेण्यासाठी रवाना झाले आहेत. देवाला प्रसन्न करण्यासाठी आपण उपवास, साग्रसंगीत नैवेद्य, असे अनेक उपाय करत असतो. प्रत्येकजण आपापल्या परीने देवावरील श्रद्धा व्यक्त करत असते.

    जमशेदपूर : पंजाबचे रितिक सक्सेना (Ritik Saxena) हातात तिरंगा घेऊन 12 ज्योतिर्लिंगांचे पायी दर्शन घेण्यासाठी रवाना झाले आहेत. देवाला प्रसन्न करण्यासाठी आपण उपवास, साग्रसंगीत नैवेद्य, असे अनेक उपाय करत असतो. प्रत्येकजण आपापल्या परीने देवावरील श्रद्धा व्यक्त करत असते. रितिकदेखील त्यापैकीच एक परंतु त्यांची भक्ती व्यक्त करण्याची पद्धत काहीशी वेगळी आहे. ते मुक्तसर साहिब या आपल्या गावाहून 1 डिसेंबर 2022 रोजी 501 रुपयांचे शगून घेऊन देवदर्शनाला निघाले.

    8 महिन्यांपूर्वी सुरू झालेला हा प्रवास आता आणखी 16 महिने चालणार आहे. दिवसातून ते तब्बल 60 किलोमीटर पायी प्रवास करतात. कधी वाटले तर, मंदिर, गुरुद्वार किंवा पोलीस स्थानकात विश्रांती घेतात.

    रितिक हे उच्चशिक्षित आहेत. त्यांनी बीटेक इंजीनियरिंगचे शिक्षण घेतले आहे. ते म्हणाले, मला आपला भारत निरखून पाहायचा होता. जेव्हा चालायला सुरुवात केली, तेव्हा कळले भारत अतिशय सुंदर आहे. केवळ लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोनही चांगला असायला हवा. महत्त्वाचे म्हणजे देवदर्शन सुरळीत पार पडावे, कोणत्याही गोष्टीसाठी माघारी परतावे लागू नये म्हणून त्यांनी सर्व सामान सोबत घेतले आहे. हे सर्व सामान मिळून रितिक यांच्याजवळ 25 ते 30 किलोंची बॅग आहे.

    याशिवाय, यमुनोत्री, गंगोत्री, बद्रीनाथ, केदारनाथ अशी उत्तराखंडातील चारधाम यात्रादेखील पूर्ण झाली आहे. तर 12 ज्योतिर्लिंगांबाबत, केदारनाथ, पशुपतीनाथ, काशी विश्वनाथ आणि बाबा धाम देवघर दर्शनानंतर आता जमशेदपूर मार्गाने ओडिशातील ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर रितिक यांची पदयात्रा यशस्वीरित्या सुरू असून मल्लिकार्जुन, रामेश्वरम, त्रंबकेश्वर, भीमाशंकर, महाकालेश्वर, ओमकारेश्वर, नागेश्वर आणि बागेश्वर धाम, मेहंदीपुर बालाजी, खाटू श्याम सोमनाथांचे दर्शनही ते घेणार आहेत.