mohan bhagwat

भारत हा महान देश व्हावा हे स्वप्न नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पाहिलं होतं जे आजही अधुरं राहिलं आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपली आहे असं मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी म्हटलं आहे.

    थोर स्वातंत्र्य सैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhashchandra Bose) यांनी देशासाठी आपलं आयुष्य अर्पण केलं. नेताजी खूप शिकलेले होते. मात्र कधीही स्वार्थाचा विचार न करता प्रत्येक निर्णय, प्रत्येक पाऊल त्यांनी देशाच्या विकासाच्या आणि स्वातंत्र्याच्या दृष्टीने टाकलं होतं, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी म्हटलं आहे. कोलकातामधील (Kolkata) कार्यक्रमात मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केलं आहे. इतकंच नाही तर भारत हा महान देश व्हावा हे स्वप्न नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पाहिलं होतं जे आजही अधुरं राहिलं आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपली आहे असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

    आज संपूर्ण देशभरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी होत आहे. आजचा दिवस हा पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचं औचित्य साधत पश्चिम बंगालमध्येही मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पराक्रम दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही एका कार्यक्रमाचं आयोजन कोलकातामध्ये केलं आहे. याच कार्यक्रमात मोहन भागवत यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयीचे आपले विचार मांडले.

    आज संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे आहे. आपला देश हा जगातला महान देश झाला पाहिजे हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पाहिलेलं स्वप्न आजही अधुरं राहिलेलं आहे आणि ते पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपल्या सगळ्यांवर आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आपल्या पूर्वजांनी आपल्याला जो मार्ग दाखवला त्या मार्गावर जात आपण जगभरात शांतता आणि बंधुभाव प्रस्थापित करू शकतो,असंही ते म्हणाले.

    आपल्या देशातलं आपलं जीवन हे ज्यांच्या त्यागामुळे आणि बलिदानामुळे मिळालेलं आहे. त्यांच्या कृतज्ञतेला सलाम करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या सगळ्यांना मिळून देशाला एक स्थान मिळवून द्यायचं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस लहानपणापासूनच खूप गुणवान आणि संवेदनशील होते. देशासाठी त्यांनी सगळं आयुष्य वेचलं. अनेकांकडे गुणवत्ता असते, संवेदनशीलता असते पण फक्त ते गुण असून काही होत नाही. आपल्या स्वार्थाचा नेताजींनी कधीही विचार केला नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ठरवलं असतं तर ते खूप पैसे कमवू शकले असते. मात्र त्यांनी देशासाठी आपलं सगळं आयुष्य वनवासातसारखं कष्ट वेचत घालवलं. देशासाठी त्यांनी एक तपश्चर्या त्यांनी हसतमुखाने केली. देशासाठी कुठलंही साहस करणं त्यासाठी आपल्या प्राणाचीही पर्वा न करणं हा गुणही नेताजींच्याच ठायी होत्या.

    स्वामी विवेकानंद म्हणायचे की भारताला गुरू गोविंद सिंग यांच्यासारख्या तरुणांची गरज आहे. गुरू गोविंद सिंग यांनी आपलं सगळं आयुष्य लढण्यात घालवलं. मात्र त्यांच्या पदरी उपेक्षाच आली. तरीही त्यांनी तोंडातून ब्र काढला नाही. जर स्वामींचं हे वर्णन लक्षात घेतलं तर त्या वर्णनाचं पालन सुभाषबाबूंनी कायमच केलं असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.