रशियाची लुना-25 मोहीम लँडिंगपूर्वीच अडचणीत! तांत्रिक दोष समोर आला

रशियाचे मिशन मून संकटाच्या ढगाखाली आहे. लुना-25 मोहीम सोमवारी चंद्रावर उतरणार आहे, पण त्याआधीच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे.

    भारताच्या चांद्रयाननंतर (Chandryaan 3) रशियानेही लुनार मिशन (Russia launches lunar lander) लुना-25 (Lina 25) लाँच केले. भारताच्या चांद्रयान-3 सोबतच रशियाचे लुना-25 देखील चंद्राच्या मार्गावर आहे. मात्र, शनिवारी (19 ऑगस्ट) लुना-25 मध्ये तांत्रिक बिघाडामुळे अडचणी आल्याची माहिती समोर आली आहे. रशियन स्पेस एजन्सी Roscosmos ने सांगितले की, शनिवारी चंद्रावर लँडिंग करण्यापूर्वी Luna-25 च्या तपासणीदरम्यान काहीतरी अडचण निर्माण झाल्याचं आढळलं असून चंद्रावर उतरण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

    11 ऑगस्ट रोजी लाँच करण्यात आलं

    रशिया जवळपास 50 वर्षात अशी पहिली मोहीम करत आहे. रशियाने तब्बल ४७ वर्षांनंतर आपले यान अंतराळात पाठवले असून 11 ऑगस्ट रोजी लाँच करण्यात आले. लुना-25 बुधवारी यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत पोहोचले मात्र, तांत्रिक बिघाडानंतर तज्ज्ञांचे पथक सध्या परिस्थितीचे विश्लेषण करत आहे. या व्यतिरिक्त स्पेस एजन्सीने इतर कोणतीही माहिती दिलेली नाही.

    Luna-25 उतरण्यास विलंब होईल का?

    या घटनेमुळे सोमवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लूना-25 च्या नियोजित लँडिंगला विलंब होईल की नाही हे रोसकॉसमॉसने सांगितले नाही. रशियन मिशन चंद्रावर वर्षभर राहण्याची अपेक्षा आहे, जिथे त्याला नमुने गोळा करणे आणि मातीचे विश्लेषण करण्याचे काम दिले जाते.

    लुना-25 लँडरवरील कॅमेऱ्यांनी आधीच अंतराळातून पृथ्वी आणि चंद्राची दूरवरची छायाचित्रे घेतली आहेत. जूनमध्ये, रोसकॉसमॉसचे प्रमुख युरी बोरिसोव्ह यांनी अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना सांगितले की, अशा मोहिमा धोकादायक आहेत आणि त्यांच्या यशाची शक्यता सुमारे 70 टक्के आहे.

    चांद्रयान-3 देखील चंद्राजवळ पोहोचले आहे

    तर, भारताचे चांद्रयान-3 देखील चंद्राच्या जवळ पोहोचले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने शुक्रवारी सांगितले की, चांद्रयान-3 चे लँडर मॉड्यूल (LM) चंद्राच्या जवळ नेणारी डीबूस्टिंग प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे आणि त्याची स्थिती सामान्य आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग 23 ऑगस्ट रोजी अपेक्षित आहे.

    रशियाने ४७ वर्षांनंतर आपले  यान पाठवले

    रशियन स्पेस एजन्सी Roscosmos ने यापूर्वी 1976 मध्ये Luna-24 लाँच केले होते. रशियाने ४७ वर्षांनंतर आपले यान पाठवले आहे. मॉस्कोपासून ५५०० किमी पूर्वेस असलेल्या अमूर ओब्लास्टच्या वोस्टोनी कॉस्मोड्रोम येथून लुना २५ लाँच करण्यात आले. भारताच्या चांद्रयान-3 च्या आधी रशियाचे लुना-25 चंद्रावर पाऊल ठेवणार असल्याचे बोलले जात आहे.