lata mangeshkars sand sculpture created by sudarshan patnaik

प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक (Sudarshan Patnaik) यांनी आपल्या वाळू शिल्प कलेच्या माध्यमातून दिदींना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यावेळी सुदर्शन पटनायक यांनी ओडिसाच्या पुरी नीलाद्री समुद्रकिनाऱ्यावर वाळू शिल्प (Sand Sculpture) तयार केलं आहे.

    ओडिसा : गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar Death Anniversary) यांची आज पहिली पुण्यातिथी आहे. लता दिदींना जाऊन आज एक वर्ष झालं. मात्र आजही त्यांच्या आठवणी आणि त्यांची गाणी अशा स्वरुपात लतादिदी आपल्यासोबत आहेत. आज अनेकांनी लतादिदींना त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहिली आहे. प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक (Sudarshan Patnaik) यांनी आपल्या वाळू शिल्प कलेच्या माध्यमातून दिदींना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यावेळी सुदर्शन पटनायक यांनी ओडिसाच्या पुरी नीलाद्री समुद्रकिनाऱ्यावर वाळू शिल्प (Sand Sculpture) तयार केलं आहे. या वाळूशिल्पामध्ये लता मंगेशकर यांचा चेहरा एका ग्रामोफोनवर तयार केलेला दिसत आहे.

    सुदर्शन पटनायक यांनी वाळू शिल्प तयार करुन त्यावर लिहिलं आहे की, “मेरी आवाज ही पहचान है, ट्रिब्यूट टू भारतरत्न लताजी”. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, सुदर्शन पटनायक यांनी लतादिदींचे 6 फूट उंच शिल्प साकारले आहे. लता मंगेशकर यांचं 6 फेब्रुवारी 2022 ला निधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

    दरम्यान लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या स्मारकाचं आज त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीला भूमिपूजन करण्यात आलं. हे स्मारक मुंबईमधील हाजी अली चौकामध्ये उभारण्यात येणार आहे. यावेळी स्मारकाच्या भूमिपूजनाला उषा मंगेशकर (Usha Mangeshkar), मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) आणि चित्रपटसृष्टीतील अनेकांनी हजेरी लावली.

    या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात उषा मंगेशकर म्हणाल्या की, “लता दीदींच्या स्मारकाचे भूमिपूजन झाले, याचा अत्यंत आनंद होत आहे. मुंबईत बांधल्या जाणाऱ्या कोस्टल रोडला लतादीदींचे नाव देण्यात यावे, अशी आमची राज्य सरकारला विनंती आहे.”