दिल्लीत इसिसचे तीन दहशतवादी; एनआयएने जाहीर केले तीन लाखांचे बक्षीस

दिल्लीत आयएसआयएस (इसिस) चे तीन दहशतवादी (Terrorist in Delhi) लपल्याचे वृत्त आहे. त्यांचा शोध घेण्यात येत असून, एनआयएने या तिन्ही दहशतवाद्यांवर तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

    नवी दिल्ली : दिल्लीत आयएसआयएस (इसिस) चे तीन दहशतवादी (Terrorist in Delhi) लपल्याचे वृत्त आहे. त्यांचा शोध घेण्यात येत असून, एनआयएने या तिन्ही दहशतवाद्यांवर तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. एनआयएकडून सातत्याने छापेमारी केली जात आहे. हे तिन्ही दहशतवादी पुणे इसिस प्रकरणात वॉन्टेड असून, त्यांचे दिल्ली कनेक्शन आढळून आल्यानंतर दिल्लीचा स्पेशल सेल या प्रकरणाचा तपास करत आहे.

    पुणे पोलिस आणि एनआयएच्या पथकांनी मध्य दिल्ली परिसरात छापे टाकले आहेत. मात्र, अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. आता गुप्तचर यंत्रणा त्यांचा शोध घेण्यात व्यस्त आहेत. सुत्रानुसार, मोहम्मद शाहनवाज आलम उर्फ शफी उज्जामा उर्फ अब्दुल्ला, रिझवान अब्दुल हाजी अली आणि अब्दुल्ला फयाज शेख अशी या तीन दहशतवाद्यांची नावे आहेत.

    नुकतेच एनआयएने पंजाब, हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले होते. छाप्यादरम्यान मोठ्या प्रमाणात पिस्तूल, दारूगोळा तसेच इतर संशयास्पद वस्तूही जप्त करण्यात आले आहे.

    पुणे प्रकरणात 7 जणांना अटक

    एनआयएने इसिस पुणे मॉड्यूल प्रकरणात 7 जणांना अटक केली होती. हे आरोपी पुण्यातील कोंढवा येथील घरातून काम करत होते. जिथे त्यांनी आयईडी एकत्र केले होते. तसेच गतवर्षी बॉम्ब प्रशिक्षण आणि निर्मिती कार्यशाळा आयोजित केली होती. आयईडीची चाचणी घेण्यासाठी या ठिकाणी नियंत्रित स्फोटही घडवून आणला.