shankaracharya and bageshwar baba

विलासपूर येथील एका कार्यक्रमात शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी बागेश्वर बाबांचं (Bageshwar Baba) नाव न घेताच, त्यांना चमत्कार दाखवण्याचं चॅलेंज दिलंय. ते म्हणाले, जोशीमठ भागात खूप भूस्खलन सुरु आहे. देशाचं लक्ष लागलेल्या या जोशीमठमध्ये त्यांनी चमत्कार दाखवावा.

    नवी दिल्लीः बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) मठाधिपती धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) उर्फ बागेश्वर बाबा यांचं नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्यांच्या चमत्कारांच्या दाव्यावर अनेक जण टिका करत आहेत. त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. एकिकडे त्यांच्यावर टीका होत असताना दुसरीकडे राजकीय नेत्यांचा पाठिंबाही त्यांना मिळतोय. शंकराचार्य (Shankaracharya) स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी आता बागेश्वर बाबांना आव्हान दिलंय. छत्तीसगड येथील विलासपूरमध्ये त्यांनी यासंदर्भात वक्तव्य केलंय.

    चमक्ताराचं चॅलेंज
    विलासपूर येथील एका कार्यक्रमात शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी बागेश्वर बाबांचं नाव न घेताच, त्यांना चमत्कार दाखवण्याचं चॅलेंज दिलंय. ते म्हणाले, जोशीमठ भागात खूप भूस्खलन सुरु आहे. देशाचं लक्ष लागलेल्या या जोशीमठमध्ये त्यांनी चमत्कार दाखवावा. हे भूस्खलन त्यांनी थांबवून दाखवावं.तरच मी त्यांना मानेन. वेदांनुसार चमत्कार दाखवणाऱ्यांनाच मी मानतो, असा दावा अविमुक्तेश्वरानंद यांनी केला आहे. मात्र फक्त स्तुती व्हावी आणि चमत्कारी बाबा म्हणून प्रसिद्धी मिळवणाऱ्यांना मी मानत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

    काही दिवसांपूर्वी शंकराचार्य यांनी जबलपूरमध्ये एक वक्तव्य केलं होतं. ब्रिटिश भारतातून गेले तेव्हा मोहम्मद अली जिन्ना म्हणाले होते. मुस्लिमांना वेगळं करा. मग भारताचे तुकडे झाले. पाकिस्तान तयार झाला होता. मात्र त्यावेळी काही मुस्लिम भारतात राहिले. त्यांना इथेच सुख शांती मिळत असेल तर पाकिस्तान बनवण्याची गरज काय? त्यामुळे या विषयावर पुनर्विचार व्हावा, अखंड भारताचा विचार करण्याबाबत त्यांनी वक्तव्य केलं आहे.

    ज्या जोशीमठाबाबतच आव्हान शंकराचार्यांनी यांनी दिलं आहे ते जोशीमठ हे उत्तराखंड राज्यातील एक गाव आहे. डेहराडून पासून 295 किलोमीटर अंतरावर असलेलं जोशीमठ हे बद्रिनाथचं प्रवेशद्वार आहे. हिमालय पर्वतरागांमध्ये मानवी हस्तक्षेप वाढला. परिणामी या गावात भूस्खलन होण्यास सुरुवात झाली आहे. संपूर्ण गावाचे स्थलांतर करण्यात आले आहे. आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या चार मठांपैकी एक जोशीमठ अथर्ववेदासाठी जबाबदार असल्याचं म्हटलं जातं. येथील भूस्खलन थांबवण्याचं चॅलेंज शंकराचार्य यांनी दिलं आहे.