
नवी दिल्ली : राष्ट्रवादीची लढाई आता निवडणूक आयोगाच्या दारात पोहचल्याने राष्ट्रवादी कोणाची हा निर्णय आता लवकरच लागणार आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर देशाच्या राजधानीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीबाबत भाष्य केलं. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वापर करण्याचा अधिकार फक्त आम्हाला आहे. त्यामुळे निर्णय आमच्याच बाजूने लागेल, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.
माझी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी निवड
माझी अध्यक्षपदाची निवड झाली होती. ती प्रोसेस मी सांगितली होती. माझ्या अध्यक्षपदाच्या प्रस्तावावर सर्वांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आता हे लोक म्हणत आहेत माझी निवड चुकीची आहे. कायद्याने सगळं होईल. चुकीच्या मार्गाने कोणी काही करण्याचा प्रयत्न केला तरी काळजीचं कारण नाही. काही चिंता करण्याची गरज नाही. निकाल आपल्याच बाजूने लागेल, असं पवार म्हणाले.
काँग्रेसवेळी पण असंच झालं होतं. दोन गट पडले होते. निवडणुकीवेळी मतदारांनी जे करायचं ते केलं. निवडणूक चिन्ह बदललं तरी लोक आपला निर्णय बदलत नाहीत. मी 5 निवडणुका 5 चिन्हावर लढल्या आणि 5 वेळी जिंकून आलो, असं पवार म्हणाले.
5 चिन्हावर मी वेगवेगळ्या वेळी लढलो
दोन बैल, चरखा, गाय वासरू, हात, घड्याळ या 5 चिन्हावर मी वेगवेगळ्या वेळी निवडून आलो. निवडणूक चिन्ह काढून घ्यायची काही लोकांची रणनीती असू शकते, पण चिंता करण्याची गरज नाही. देशाचे वातावरण बदलत आहे. सरकार पाडून भाजपने सत्ता मिळवली आहे. त्यामुळे लोकांना याची जाणीव असल्याचं पवार म्हणाले.
देशातील तपास यंत्रणांचा गैरवापर
आज एजन्सी कडून काही लोकांना त्रास दिला जातोय. गावा गावात ed, cbi बद्दल चर्चा आहे. या यंत्रणा चुकीच्या इशाऱ्यावर काम करत आहेत.आपच्या राज्यसभा सदस्याच्या घरावर सकाळी 7 पासून छापे टाकले आणि रात्री त्यांना अटक केलं. आज तमिळनाडूत सकाळपासून DMK च्या नेत्यांच्या घरावर छापे टाकले जात आहे, असं पवार म्हणाले.
पश्चिम बंगाल मध्येही छापेमारी सुरू आहे. 13 महिने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना जेलमध्ये टाकलं. नंतर काही सिद्ध झालं नाही. शिवसेना नेता संजय राऊत यांना जेलमध्ये टाकलं. का तर ते भाजप विरोधात लिहीत बोलत होते. दहा वर्षांपूर्वी देखील ईडी संस्था होती. पण, अशी संस्था असल्याचं अनेकांना माहिती नव्हतं. संस्थेचा चुकीचा वापर केला जात आहे, असं पवार म्हणाले