ऐन थंडीत महाराष्ट्रात अंड्यांचा तुटवडा, मागणी जास्त अन् पुरवठा कमी, काय आहे कारण : जाणून घ्या सविस्तर

महाराष्ट्रात दररोज 2.25 कोटीहून जास्त अंड्यांची मागणी आहे. मात्र राज्यात अंड्यांचे दैनंदिन उत्पादन केवळ 1.25 कोटी आहे. त्यामुळे अंड्यांची मागणी जास्त आणि कमी पुरवठा आहे. म्हणूनच राज्यात सातत्याने अंड्यांच्या किंमती वाढत आहेत.

    महाराष्ट्रात (Maharashtra) अंड्यांचा (Egg) तुटवडा निर्माण झाला असल्याने पशुसंवर्धन विभागाला इतर राज्यांमधून (State) अंड्यांची खरेदी करावी लागत आहे. अंड्याचं उत्पादन वाढवण्यासाठी राज्य सरकार सध्या नव्या योजना आखत आहे. योजना यशस्वी झाल्यास अंड्यांचा तुटवडा होणार नाही अशी आशा आहे. महाराष्ट्र आणि अमेरिकेत अंड्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. दोन्ही ठिकाणी याची कारणे वेगळी आहेत.

    मागणी जास्त आणि कमी पुरवठा

    महाराष्ट्रात दररोज 2.25 कोटीहून जास्त अंड्यांची मागणी आहे. मात्र राज्यात अंड्यांचे दैनंदिन उत्पादन केवळ 1.25 कोटी आहे. त्यामुळे अंड्यांची मागणी जास्त आणि कमी पुरवठा आहे. म्हणूनच राज्यात सातत्याने अंड्यांच्या किंमती वाढत आहेत. दरम्यान वाढती मागणी लक्षात घेता पशुसंवर्धन विभाग नवीन योजना आखत आहे. पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर धनंजय यांनी पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली आहे. सध्या राज्यातील तुटवडा लक्षात घेता कर्नाटक, तेलंगण आणि तामिळनाडूमधून अंडी खरेदी केली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

    …तर अंड्यांचा तुटवडा कमी होईल

    “उत्पादन वाढवण्यासाठी पशुसंवर्धन विभाग प्रत्येक जिल्ह्याला २१ हजारांच्या अनुदानित दराने 50 व्हाईट लेघॉर्न कोंबड्यांचे 1,000 पिंजरे देण्याची योजना आखत आहे,” अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. यासंबंधी पशुसंवर्धन विभागाने राज्य सरकारने प्रस्ताव मांडला आहे. हा प्रस्ताव संमत झाल्यास राज्यातील अंड्यांचा तुटवडा कमी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

    अंड्यांची मागणी का वाढली?

    मागच्या दोन आठवड्यांपासून हे दर वाढलेले दिसतायत. हे दर आताच का वाढलेत तर, थंडीमध्ये अंडी खाणं हे शरिरासाठी फायदेशीर असतं. शरिराला आवश्यक प्रोटिन्स अंड्यांमधून मिळतात. याशिवाय, शरिराचं तापमान वाढवून ठेवण्यासाठीही अंडी फायदेशीर असतात. त्यामुळे, मागच्या दोन आठवड्यांपासून अंड्यांची मागणी वाढली आहे, तुटवडा भासतोय आणि किंमत वाढली आहे. आता ही समस्या लहान वाटत असली तरी, पशुसंवर्धन विभागाने पुढे ही समस्या आणखी मोठी होऊ शकते हे लक्षात घेऊन वेळीच उपाय- योजनांना सुरूवात केली आहे.

    अमेरिकेत बर्ड फ्ल्यू आणि महागाई

    काही दिवसांपूर्वी अमेरिकेत बर्ड फ्ल्यूचा प्रसार झाला होता. याशिवाय कोंबड्यांना खायला दिले जाणारे दाणे, तेल आणि वाढत्या मजुरीमुळे उद्योगाला नुकसान सहन करावे लागत आहे. यामुळे अमेरिकेत अंड्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे आणि किंमती वाढल्या आहेत.

    महाराष्ट्रात ही टंचाई कशी भरून काढली जात आहे?

    महाराष्ट्रात कर्नाटक, तेलंगाणा आणि तमिळनाडूतून अंडी मागवली जात आहेत. याशिवाय राज्याचा पशूसंवर्धन विभाग अनुदान आणि इतर सुविधा देऊन अंड्यांचे उत्पादन वाढवण्याचे काम करत आहे. एका अंड्याचे पोषण मूल्य खालील पॉईंटसमधून समजून घ्या…

    कॅलरीज – 75
    प्रोटिन – 7 ग्रॅम
    फॅट – 5 ग्रॅम
    सॅच्युरेटेड फॅट – 1.6 ग्रॅम
    आयर्न, व्हिटामिन आणि मिनरल्स

    अंड्यांचा तुटवड्यामुळे काय अडचणी येऊ शकतात?

    महाराष्ट्रात अंड्यांच्या किंमती वाढल्या आहेत, यामुळे बहुतांश लोक नाष्ट्यात अंडे आणि ब्रेड यासाठी खातात की ते स्वस्त आणि लवकर तयार होणारा पर्याय आहे. किंमत वाढल्याने अडचणी होत आहेत. बेकरी उत्पादने महाग होऊ शकतात, कारण ते बनवण्यासाठी अंड्यांचाच वापर केला जातो. जिमला जाणाऱ्या लोकांनाही अडचणी होतील कारण प्रोटिन इनटेकसाठी बहुतांश लोक अंड्यांवरच अवलंबून आहेत.