शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा! हुतात्म्यांच्या बहिणी आणि मुलींना मिळणार सैन्यात नोकरी; लवकरच निर्णय?

    मुंबई : सध्या भारतीय लष्कराच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याचे काम काही पातळ्यांवर सुरु असून आता शहीद जवानाच्या बहीण आणि मुलीला लष्करात अनुकंपा तत्त्वावर सैन्यात नोकरी मिळून देण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे.

    संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय समितीच्या शिफारशीनंतर सरकार यावर गांभीर्यानं विचार करत आहे. समितीनं (Parliamentary Committee) अशी नियुक्ती लिंगभेद न करता करण्याची शिफारस केली होती. त्यात म्हटलंय, शहीद जवानाचा मुलगा, भाऊ अथवा मुलगी आणि बहिणीला अनुकंपा तत्त्वावर सैन्यात नोकरी दिली जावी, असं नमूद केलंय.

    काय आहे नियम?

    सध्याच्या नियमांनुसार, ‘जेसीओ (JCO) किंवा कोणत्याही दर्जाचा जवान युद्धात मारला गेला तर लष्कर त्याच्या एका मुलाला ताबडतोब सैन्यात नियुक्त करतं. पण, कन्येची नियुक्ती करण्याचा पर्याय अद्याप उपलब्ध नाहीये. जर शहीद जवान अविवाहित असेल, तर त्याच्या भावाला ही संधी दिली जाते, पण बहिणीला पर्याय नाही.’ तेव्हा या नियमात काही प्रमाणात बदल करण्यात येणार आहेत.