जालंधरच्या लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीत राडा, वसतिगृहात विद्यार्थ्यांची आत्महत्या

विद्यापीठात गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी रात्री उशिरा लाठीचार्जही केला. तत्पूर्वी पोलीस त्यांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. मात्र विद्यार्थ्यांनी गोंधळ घातल्याने पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून त्यांना हटवले. यामध्ये काही विद्यार्थी जखमीही झाले आहेत.

    नवी दिल्ली – चंदिगड युनिव्हर्सिटी व्हिडिओ स्कँडलचा वाद थांबत नाही तोच जालंधरच्या लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये गदारोळ झाला आहे. विद्यापीठाच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. केरळमधील रहिवासी एजिन एस दिलीप कुमार याच्या खोलीतून सुसाइड नोटही सापडली आहे.

    विद्यापीठात गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी रात्री उशिरा लाठीचार्जही केला. तत्पूर्वी पोलीस त्यांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. मात्र विद्यार्थ्यांनी गोंधळ घातल्याने पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करून त्यांना हटवले. यामध्ये काही विद्यार्थी जखमीही झाले आहेत.

    या घटनेनंतर विद्यापीठातील संतप्त विद्यार्थ्यांनी वसतिगृहाबाहेर येऊन रात्रभर गोंधळ घातला. यावेळी त्यांनी विद्यापीठ प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. मृत्यू झालेला विद्यार्थी वाचू शकला असता, मात्र रुग्णवाहिका विद्यापीठात उशिरा पोहोचली, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. यासोबतच मृताच्या खोलीतून सापडलेली सुसाईड नोट सार्वजनिक करण्यात यावी, अशी मागणीही विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. विद्यार्थी वुई वॉन्ट जस्टिसच्या घोषणा देत होते. पोलीस रात्रभर वातावरण शांत करण्याचा प्रयत्न करत होते.