‘नीट’ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; सहाव्या मजल्यावरून उडी घेत संपवले जीवन

राजस्थानमधील कोटा येथे कोचिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या (Student Suicide) घटना सुरूच आहे. रविवारी आणखी एका विद्यार्थ्याने इमारतीवरून उडी मारून जीवन संपवले. अविष्कार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो महाराष्ट्रातील रहिवासी आहे. तो कोटा येथे राहून 'नीट'ची तयारी करत होता. रविवारी त्याचा पेपर होता, असे सांगण्यात येत आहे.

    कोटा : राजस्थानमधील कोटा येथे कोचिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या (Student Suicide) घटना सुरूच आहे. रविवारी आणखी एका विद्यार्थ्याने इमारतीवरून उडी मारून जीवन संपवले. अविष्कार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो महाराष्ट्रातील रहिवासी आहे. तो कोटा येथे राहून ‘नीट’ची तयारी करत होता. रविवारी त्याचा पेपर होता, असे सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्याने टेरेसवरून उडी मारल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

    पोलिस सूत्रानसार, अविष्कार हा विद्यार्थी त्याच्या आजीसोबत राहत होता. तो रविवारी परीक्षा देण्यासाठी गेला होता. परीक्षा दिल्यानंतर अविष्कार इमारतीच्या सहाव्या मजल्यावर गेला आणि तिथून खाली उडी मारली. विद्यार्थ्याच्या आत्महत्येचा व्हिडिओही समोर आला आहे. विद्यार्थी टेरेसच्या दिशेने जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. दुसऱ्या फुटेजमध्ये तो पार्किंगमध्ये कोसळताना दिसत आहे. इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडल्याने अविष्कारचा जागीच मृत्यू झाला.

    विद्यार्थ्याच्या आत्महत्येमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या वर्षात आतापर्यंत 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील बहुतांश विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमागे अभ्यासाबाबतचा तणाव समोर आला आहे. हा ताण कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन, कोचिंग इन्स्टिट्यूट, वसतिगृहे यांना आतापर्यंत यश आलेले नाही. अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यांच्या मृत्यूमागील अनेक प्रश्न आजही तसेच आहेत.