‘मी तिच्यावर प्रेम करावं, तिला साथ द्यावी एवढीचं तिची इच्छा…सुकेश चंद्रशेखरचा जॅकलीनसोबतच्या नात्यावर खुलासा

जॅकलिनचा जामीन अर्ज फेटाळण्यासाठी ईडीकडून अनेक युक्तिवाद करण्यात आले. अभिनेत्रीने तपासात सहकार्य केले नसल्याचा दावा ईडीने केला आहे. यासोबतच जॅकलिनने पुराव्यांशी छेडछाड केल्याचेही ईडीच्या वतीने सांगण्यात आले.

    नवी दिल्ली : 200 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप असलेला सुकेश चंद्रशेखर सध्या मंडोळी तुरुंगात आहे. या प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसही अडकली आहे. सुकेशने फसवणूक करून तिला अनेक महागड्या गिफ्ट्स दिल्याचा आरोप जॅकलिनवर आहे. जॅकलीन आणि सुकेश खूप जवळ होते असाही दावा केला जात आहे. याच कारणावरून अभिनेत्री जॅकलिनचीही चौकशी करण्यात येतेय. आता सुकेश चंद्रशेखर यांनी मंडोली तुरुंगातून आपल्या वकिलाला एक पत्र लिहिले असून त्यात त्यांनी जॅकलिन निर्दोष असल्याचं म्हणंटल आहे.

    ‘सध्या माझ्यावरील आरोप हा केवळ आरोप आहे, जे न्यायालयात पुराव्यासह सादर करावे  लागणार आहे. पीएमएलए अंतर्गत जॅकलीनला आरोपी बनवण्यात आले आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही दोघे रिलेशनशिपमध्ये होतो आणि त्याअंतर्गत मी जॅकलीन आणि तिच्या कुटुंबाला भेटवस्तू दिल्या. यात जॅकलीनचा काय दोष?  ‘जॅकलीनने माझ्याकडून कधीही काहीही मागितले नाही. मी तिच्यावर प्रेम करावे आणि नेहमी तिच्या पाठीशी उभे राहावे अशी तिची इच्छा होती. मी जॅकलिनला दिलेल्या सर्व भेटवस्तू माझ्या मेहनतीच्या कमाईचा भाग होत्या. येत्या काळात खटल्याच्या वेळी न्यायालयातही हे सिद्ध करेन. असेही त्याने लिहिले आहे.

    सुकेशने या पत्रात पुढे लिहिले आहे की, येत्या काळात मी न्यायालयात हे सिद्ध करेन की, जॅकलिन आणि तिच्या कुटुंबीयांना या प्रकरणात जबरदस्तीने ओढले जात आहे. यात त्यांचा दोष नाही. मला विश्वास आहे की एक दिवस मी जॅकलीनला तिने गमावलेले सर्व काही देईन आणि तिची निर्दोषता सिद्ध करेन. माझ्या विरोधात जे काही चालले आहे ते फक्त राजकीय षडयंत्र आहे.

    सुकेश चंद्रशेखर प्रकरणात जॅकलिनची अनेकवेळा चौकशी करण्यात आली असून सध्या ती अंतरिम जामिनावर बाहेर आहे. शनिवारी, 22 ऑक्टोबर रोजी, पटियाला हाऊस कोर्टाने जॅकलीनच्या अंतरिम जामिनाची मुदत 10 नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे. यादरम्यान अभिनेत्री कोर्टात हजर झाली. मात्र, अंमलबजावणी संचालनालयाने अभिनेत्रीच्या जामिनाला न्यायालयात विरोध केला. जॅकलिनचा जामीन अर्ज फेटाळण्यासाठी ईडीकडून अनेक युक्तिवाद करण्यात आले. अभिनेत्रीने तपासात सहकार्य केले नसल्याचा दावा ईडीने केला आहे. यासोबतच जॅकलिनने पुराव्यांशी छेडछाड केल्याचेही ईडीच्या वतीने सांगण्यात आले. मात्र, या सगळ्यामध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर जॅकलिनला कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.