शास्त्रज्ञ आता सूर्यप्रकाश कमी करण्याच्या तयारीत, पण त्याने काय होणार फायदा? भारताची भूमिका काय? जाणून घ्या…

आत्तापर्यंत शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधामुळे अनेक मोठे बदल घडले आहेत. पण आता काही देशांचे शास्त्रज्ञ सूर्यप्रकाश (Sun Light) आणि उष्णता (Sun Heat) वापरण्याच्या प्रकल्पावर काम करत आहेत. सूर्याची उष्णता कमी झाल्यास पृथ्वीवरील ग्लोबल वॉर्मिंगविरुद्धच्या मोहिमेत मोठे यश मिळेल, असा त्यांचा दावा आहे.

    नवी दिल्ली : आत्तापर्यंत शास्त्रज्ञांनी लावलेल्या शोधामुळे अनेक मोठे बदल घडले आहेत. पण आता काही देशांचे शास्त्रज्ञ सूर्यप्रकाश (Sun Light) आणि उष्णता (Sun Heat) वापरण्याच्या प्रकल्पावर काम करत आहेत. सूर्याची उष्णता कमी झाल्यास पृथ्वीवरील ग्लोबल वॉर्मिंगविरुद्धच्या मोहिमेत मोठे यश मिळेल, असा त्यांचा दावा आहे. मात्र, या प्रकल्पाला काही शास्त्रज्ञांचाच विरोध आहे. त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की, हा प्रकल्प तातडीने थांबवला नाही, तर येत्या काळात हे पृथ्वीसाठी आत्मघातकी पाऊल ठरू शकते.

    सूर्य अंधूक करण्याच्या या प्रकल्पानंतर मोठी गुंतवणूक आल्याने आता या प्रकरणाच्या चर्चेलाही उधाण आले आहे. सूर्यप्रकाश कमी करण्याच्या या संशोधनाला शास्त्रज्ञ सोलर जिओ इंजिनिअरिंग म्हणत आहेत. सर्व धोक्यांबाबत शास्त्रज्ञांनी इशारे दिल्यानंतरही या प्रकल्पावर काम करणारे शास्त्रज्ञ थांबण्याचे नाव घेत नाहीत. या प्रकल्पाशी संबंधित अनेक देशांमध्ये भारताचे नाव देखील आहे.

    सूर्यप्रकाश कसा होईल कमी?

    या प्रकल्पांतर्गत पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या थरावर सल्फरची फवारणी केली जाणार असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. सल्फरचा थर सूर्याच्या किरणांना परावर्तित करून पुन्हा अवकाशात पाठवेल. यामुळे सूर्यप्रकाश संपूर्ण उष्णतेसह पृथ्वीवर पोहोचू शकणार नाही. त्यामुळे पृथ्वीवरील तापमानात फारशी वाढ होणार नाही. या प्रकल्पावर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना विश्वास आहे की, यामुळे ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यात मदत होईल. आता त्यांना या प्रकल्पासाठी मोठी गुंतवणूक मिळाल्याने ते या प्रकल्पाचे काम पुढे करू शकतील.

    कोण करतंय आर्थिक मदत?

    ब्रिटनची सामाजिक संस्था डिग्री इनिशिएटिव्हने सांगितले की, या प्रकल्पासाठी 7.44 कोटी रुपयांची ($ 9 लाख) मदत दिली जात आहे. सध्या सोलर जिओ इंजिनिअरिंग प्रकल्पावर 15 दिवसांत संशोधनाचे काम सुरू आहे. भारताशिवाय नायजेरिया आणि चिली या देशांचाही यात समावेश आहे. या प्रकल्पात बहुतांश विकसनशील देशांचा सहभाग आहे. मान्सूनवर सौर अभियांत्रिकीचा काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यासाठी ही आर्थिक मदत देण्यात येत असल्याचे सामाजिक संस्थेने सांगितले.

    प्रकल्पाला विरोध का?

    सूर्यप्रकाश कमी करण्याच्या या प्रकल्पाला काही शास्त्रज्ञ विरोध करत आहेत. ते म्हणतात की, जर आपण अशाप्रकारे हवामान बदलांना सामोरे जाण्याची आशा निर्माण केली तर जीवाश्म इंधनाचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्या ग्लोबल वॉर्मिंगला सामोरे जाण्याच्या बाबतीत हातावर हात ठेवून बसतील. त्याचवेळी, या तंत्राचा वापर हवामान चक्र खराब करू शकतो. त्यामुळे विकसनशील देशांमध्ये गरिबी वाढण्याचा धोका निर्माण होईल, असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे.