मोदी सरकारने नऊ वर्षात नऊ सरकार पाडली; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल

  नवी दिल्ली : मणिपूरमधील हिंसाचारावरून मोदी सरकारविरोधात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर भाषणे ठोकून विरोधकांनी संसद दणाणून सोडली. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्यापासून खासदार सुप्रिया सुळे, अरविंद सावंत या सर्वांनी मोदी-शाहांच्या कारभाराचे लक्तरे काढली. त्यावर भाजपच्या खासदारांनीही विरोधकांचे हल्ले त्यांच्याच भाषेत परतावून लावले.

  संसदेत सत्ताधारी-विरोधक चांगलेच भिडले
  परिणामी संसदेत सत्ताधारी-विरोधक चांगलेच भिडल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपची कोंडी करत प्रश्नांची सरबत्ती केली. त्याचवेळी मंत्री आणि सत्ताधारी पक्षाची भाषा ही हे सरकार अत्यंत अहंकारी असल्याचे दिसत आहे, असा घणाघात सुळेंनी मोदी सरकारवर केला.

  अविश्वास प्रस्तासंदर्भात सभागृहात चर्चा
  विरोधकांनी मणिपूरमधील हिंसाचारावरून लोकसभेत आणलेल्या अविश्वास प्रस्तासंदर्भात सभागृहात चर्चा झाली. यावर सत्ताधारी खासदारांनीही आपली भूमिका मांडली. यामध्ये अमरावतीच्या खासदार नवणीत राणा या देखील विरोधकांना भिडल्याचे पाहायला मिळाल्या. तर दुसरीकडे मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षांत नऊ सरकारं पाडली आहेत, असा शब्दात सुप्रिया सुळे यांनी सरकारला सुनावले.

  या राज्यात सरकारे पाडली
  अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश आणि पुडुचेरी या राज्यातील सरकारं पाडल्याचे सांगून सरकारवर घणाघात केला. तसेच मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी करत मणिपूरच्या परिस्थितीमध्ये सरकार इतके असंवेदनशील कसे वागू शकते, असा सवाल देखील त्यांनी सरकारला विचारला