अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या तलाठ्याला ट्रकखाली चिरडले; तलाठी जागीच ठार

मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या तलाठ्याला वाळू माफियांनी ट्रॅक्टरखाली चिरडून ठार केले. रीवा जिल्ह्यातील रहिवासी असलेले ४५ वर्षीय प्रसन्न सिंह हे बेओहारी येथे तलाठी म्हणून तैनात होते.

    भोपाळ : मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या तलाठ्याला वाळू माफियांनी ट्रॅक्टरखाली चिरडून ठार केले. रीवा जिल्ह्यातील रहिवासी असलेले ४५ वर्षीय प्रसन्न सिंह हे बेओहारी येथे तलाठी म्हणून तैनात होते. अवैध उत्खनन होत असल्याची माहिती मिळताच रात्रीच त्यांनी तीन सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठले होते. त्यावेळी ही घटना घडली.

    काही लोक ट्रॅक्टरमधून अवैध वाळू वाहतूक करत असल्याचे पटवारी यांना दिसले. तलाठी प्रसन्न सिंह यांनी ट्रॅक्टरसमोर येऊन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रॅक्टर चालकाने सिंह यांना चिरडून तेथून पळ काढला. यापूर्वी माफिया सोन नदीतून अवैध उत्खनन करत होते.

    आरोपी चालकास अटक

    घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी करून आरोपी ट्रॅक्टर चालकाला मैहर जिल्ह्यातून अटक केली. आरोपी चालक शुभम विश्वकर्मा आणि ट्रॅक्टर मालक प्रशांत सिंह हे दोघेही मैहर येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.