student molested by teacher

रांचीमध्ये कोचिंग क्लासचा संचालक अल्पवयीन मुलींना IAS बनवण्याचं स्वप्न दाखवत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. तो इतक्यावरच थांबला नाही तर त्याने अल्पवयीन मुलींवर अत्याचार करताना त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार केले.

    रांची: शिक्षकाला किंवा कोणत्याही गुरुला देवाचा दर्जा दिला जातो पण झारखंडमधील एका शिक्षकाने या पेशाला काळिमा फासणारं कृत्य केलं आहे. झारखंडमधील (Jharkhand News) रांची येथे युपीएससीची तयारी करणाऱ्या कोचिंग संचालकाने दोन अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण (Teacher Molested Girl Students) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Ranchi Crime News)

    या कोचिंग क्लासचा संचालक अल्पवयीन मुलींना IAS बनवण्याचं स्वप्न दाखवत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. तो इतक्यावरच थांबला नाही तर त्याने अल्पवयीन मुलींवर अत्याचार करताना त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार केले. यानंतर त्यांना धमकावत त्याने वारंवार मुलींवर अत्याचार केले. पशुपती नाथ असं या आरोपीचं नाव आहे.

    काय आहे प्रकरण?
    झारखंडमधील रांची येथे पशुपती नाथ नावाची व्यक्ती यूपीएससीचे कोचिंग चालवत होती. पशुपती नाथ हा मूळचा बिहारचा आहे. मात्र तो रांची येथील एका घरात कोचिंग क्लास घेत असल्याची माहिती मिळाली आहे. त्याच्याकडे दोन अल्पवयीन विद्यार्थिनी अभ्यासासाठी येत होत्या.

    दोन विद्यार्थिनींपैकी एका पीडित विद्यार्थिनीने एकदा कोचिंगला जाण्यास नकार दिला. त्या विद्यार्थिनीच्या वडिलांनी तिला त्याचं कारण विचारलं. मुलीने कारण सांगितलं तेव्हा तिच्या वडिलांना मोठा धक्काच बसला. तिने सांगितलं की, पशुपतीनाथ अभ्यासाच्या बहाण्याने तिच्या नाजूक अवयवांना हाताने स्पर्श करायचा. याशिवाय तो दोन्ही मुलींशी जबरदस्तीने संबंध ठेवत होता. आरोपी पशुपतीनाथने त्यांचे अश्लील व्हिडिओही बनवल्याचं तिनं वडिलांना सांगितलं.

    ग्रामस्थांनी आरोपीला शिकवला धडा
    आरोपी शिक्षक मुलींना व्हॉट्स ॲपवर मेसेजवर शिवीगाळ करत होता. अनेकदा त्यांचं लैंगिक शोषण त्याने केलं होतं. इतकंच नाही तर मुलींना ब्लॅकमेल करून आईचे दागिने घरून आणण्यास सांगत होता. मात्र मुलीने केलेल्या तक्रारीनंतर हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात आला. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी कोचिंग क्लास गाठून शिक्षकाला मारहाण केली.

    सोमवारी रात्री गावकऱ्यांनी आरोपी पशुपतीनाथला पोलिसांच्या हवाली केलं. या प्रकरणी आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा कायदा अल्पवयीनांच्या लैंगिक छळ आणि लैंगिक शोषणासंबंधित आहे.