राजस्थानात फिरायला गेलेल्या शिक्षक कुटुंबावर काळाचा घाला; चिमुकल्यासह सहा जणांचा मृत्यू

मध्य राजस्थानमध्ये फिरायला गेलेल्या शिक्षकांच्या कुटुंबाचा (Teachers Accident in Rajasthan) भीषण अपघात झाला. या अपघातात चिमुकल्यासह सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी आहे.

    जयपूर : मध्य राजस्थानमध्ये फिरायला गेलेल्या शिक्षकांच्या कुटुंबाचा (Teachers Accident in Rajasthan) भीषण अपघात झाला. या अपघातात चिमुकल्यासह सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी आहे. हे शिक्षक कुटुंब जळगावातील अमळनेर तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.

    अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील शिक्षक धनराज नागराज सोनवणे व योगेश धोंडू साळुंखे व दिनेश सूर्यवंशी यांचे कुटुंब अशा दोन गाड्यातून राजस्थान फिरण्यासाठी लक्ष्मीपूजन आटपून निघाले होते. राजस्थानमधील बाडमेर जैसलमेर राष्ट्रीय महामार्गावर जैसलमेरकडून जात असताना सोमवारी (दि.१४) सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास सुरतेची बेरीजजवळ ट्रक व त्‍यांच्या कारची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला.

    या अपघातात धनराज नागराज सोनवणे (वय 55), सुरेखा धनराज सोनवणे (वय 50), स्वरांजली धनराज सोनवणे (वय 4), गायत्री योगेश साळुंखे (वय 30), भाग्यश्री योगेश साळुंखे (वय 1), प्रशांत योगेश साळुंखे (वय 7) हे जागीच ठार झाले आहेत. अपघात होण्यापूर्वी धनराज सोनवणे हे जे वाहन चालवत होते त्या वाहनांमध्ये योगेश साळुंखे हे त्याच्या कुटुंबासह बसलेले होते. मात्र, दुसऱ्या गाडीतील दिनेश सूर्यवंशी यांनी त्यांना फोन करून वाहन चालवण्यासाठी बोलवले होते. त्यामुळे ते अपघातात सुदैवाने वाचले. मात्र, या अपघातात पत्नी, मुलगा, मुलगी हे ठार झाले.