मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली; रुग्णालयात केलं दाखल, डॉक्टरांनी सांगितलं….

भारत राष्ट्र समितीचे (BRS) अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांची तब्येत आज अचानक बिघडली. पोटात दुखू लागल्याने त्यांना खासगी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हैदराबाद : भारत राष्ट्र समितीचे (BRS) अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांची तब्येत आज अचानक बिघडली. पोटात दुखू लागल्याने त्यांना खासगी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामध्ये त्यांना अल्सरचे (Ulcer) निदान झाले असून, त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. त्यांना इतर कोणत्याही प्रकारचा त्रास नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

याबाबत रुग्णालय प्रशासनाने निवेदन जारी केले असून, त्यामध्ये महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली. त्यात म्हटले की, मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना आज सकाळपासून पोटाचा त्रास जाणवत होता. दुपारी त्यांना एआयजी रुग्णालयात आणण्यात आले. त्यांची सीटी स्कॅन आणि एन्डोस्कोपी करण्यात आली. त्यांच्या पोटात अल्सर असल्याचे तपासात समोर आले असून, त्यासाठी औषधे दिली जात आहेत. त्यांना इतर कोणताही त्रास जाणवत नाही. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

रुग्णालयाने जारी केले बुलेटिन

हेल्थ बुलेटिन जारी करताना, एआयजी हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले की, डॉ. नागेश्वर रेड्डी यांच्या टीमकडून के. चंद्रशेखर राव यांच्यावर उपचार केले जात आहेत. यादरम्यान त्यांच्या पोटात एक छोटासा व्रण निघाला, त्यानंतर त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे. वैद्यकीय टीमच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.