जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद थांबेना : शोपियानमध्ये सीआरपीएफच्या पथकावर हल्ला, चकमकीत एक नागरिक ठार

दहशतवाद्यांनी सीआरपीएफ आणि एसओजीच्या संयुक्त पथकाला लक्ष्य केले. प्रत्युत्तरादाखल गोळीबार करताना दहशतवादी जवळच्या जंगलात पळून गेले. सध्या शोधमोहीम सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या १८२ बटालियन आणि एसओजीच्या गटाला लक्ष्य केले होते.

    नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले थांबत नाहीत. शोपियानमध्ये रविवारी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी सीआरपीएफ आणि एसओजीच्या संयुक्त पथकाला लक्ष्य केले. प्रत्युत्तरादाखल गोळीबार करताना दहशतवादी जवळच्या जंगलात पळून गेले. सध्या शोधमोहीम सुरू आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या १८२ बटालियन आणि एसओजीच्या गटाला लक्ष्य केले होते. या चकमकीत शोएब गनी हा स्थानिक नागरिक ठार झाला.

    राहुल भट्ट यांची सरकारी कार्यालयात हत्या
    यापूर्वी गुरुवारी दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची हत्या केली होती. राहुल हा बडगाम येथील चदूरा तहसील कार्यालयाचा लिपिक होता. दहशतवाद्यांनी सरकारी कार्यालयात घुसून त्याच्यावर गोळीबार केला, राहुलच्या साथीदारांनी त्याला रुग्णालयात नेले. येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. राहुलच्या हत्येला २४ तासही उलटले नव्हते की, दहशतवादी रियाझ या एसपीओच्या घरात घुसले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. राहुल भट्टच्या हत्येनंतर २४ तासांच्या आत सुरक्षा दलांनी त्याच्या हत्येत सामील असलेल्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

    या हत्यांनंतर काश्मीरसह देशभरात संताप व्यक्त होत आहे. लोक या हत्यांविरोधात निदर्शने करत आहेत. काश्मीरच्या स्थानिक नेत्यांनी या हत्यांसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरले. मेहबुबा मुफ्ती आणि फारुख अब्दुल्ला म्हणाले की, केंद्र सरकार काश्मिरींना सुरक्षा देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे.