जम्मू-काश्मीरमधील लिथियमच्या साठ्यावर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी! संसाधन इथून बाहेर जाता कामा नये! संघटनेनं दिली धमकी

जम्मू-काश्मीरमध्ये लिथियमचे साठे सापडले आहेत. हे सौर पॅनेल आणि बॅटरी बनवण्यासाठी वापरले जाते. आता दहशतवादी संघटनेने धमकी दिली आहे की, जर कोणत्याही कंपनीने यात हात घातला तर त्यांच्यावर हल्ला केला जाईल.

  देशात पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमधील (jammu kashmir) रियासी (reasi)जिल्ह्यात लिथियमचा (Lithium) मोठा साठा सापडला आहे. मात्र, आता या पांढऱ्या सोन्यावर दहशतवाद्यांची दृष्ट पडलीये. एका दहशतवादी संघटनेने यासंदर्भात भारतीय कंपनीला धमकी दिली आहे. अँटी फॅसिस्ट फ्रंट या दहशतवादी संघटनेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जम्मू-काश्मीरच्या संसाधनांचे ‘शोषण’ आणि ‘चोरी’ कोणत्याही परिस्थितीत होऊ दिली जाणार नाही. ही संसाधने जम्मू-काश्मीरमधील लोकांची आहेत आणि त्यांच्या हितासाठीच वापरली जावीत, असे दहशतवादी संघटनेने म्हटले आहे.

  दहशतवाद्यांचा काय म्हणणं?

  दहशतवादी संघटनेने कंपन्यांना धमकी दिली आणि जम्मू-काश्मीरमध्ये खाणकाम करणाऱ्या कोणत्याही कंपनीवर हल्ला केला जाईल, असे सांगितले. केंद्रीय मंत्रालयाने गुरुवारी सांगितले होते की, जम्मू-काश्मीरमध्ये 5.0 दशलक्ष टन लिथियमचा साठा सापडला आहे. रियासी जिल्ह्यातील सलाल गावात तो सापडला आहे. हे गाव माता वैष्णोदेवीच्या डोंगराजवळ वसलेले आहे. गेल्या वर्षी कर्नाटकातील मारलागल्ला येथेही 1600 टन लिथियमचा साठा सापडला होता. लिथियम हे खनिज आहे जे इलेक्ट्रिक वाहने, स्मार्टफोन आणि रिचार्ज करण्यायोग्य बॅटरीमध्ये वापरले जाते. त्याची मागणी सातत्याने वाढत आहे पण भारत यासाठी आयातीवर 100 टक्के अवलंबून आहे. लिथियमचा हा साठा आत्मनिर्भर भारत आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या दिशेने खूप प्रभावी ठरू शकतो. यामुळे सरकारची मोठी बचतही होऊ शकते. तथापि, लिथियम शुद्ध करण्याची प्रक्रिया सोपी नाही.

  लिथीयमचा वापर कशात होतो

  जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीरमधील सलाल-हिमाना प्रदेशात लिथियमचा साठा सापडला आहे. देशात याचे एकूण ५१ ब्लॉक सापडले आहे. यापैकी ५ ब्लॉकमध्ये लिथियम, गोल्ड, पोटॅश, मॉलिब्डेनमचे साठे आहेत. २०१८ ते आतापर्यंत हे ब्लॉक्स शोधण्यात आले आहेत. याशिवाय १७ ब्लॉक्समध्ये कोळशाचा साठा आहे.

  लिथियम हा नॉन-फेरस धातू असून तो इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीमध्ये वापरला जातो. मोबाईल फोन,लॅपटॉप, डिजिटल कॅमेरा किंवा सोलर पॅनेल, इलेक्ट्रिक वाहनांसाठी रिचार्ज करण्यायोग्य बॅटरीमध्ये वापरला जातो. याशिवाय खेळणी आणि घड्याळांसाठीही याचा वापर होतो. आता  हा साठा सापडल्यामुळे त्याचा मुबलत प्रमाणात वापर होऊन देशातल्या ईव्ही उद्योगाला मोठं बळ मिळणार.

  भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने धोरणात्मक आणि महत्त्वाच्या खनिजांवर 115 प्रकल्प तयार केले आहेत. त्याचबरोबर खत खनिजांसाठी 16 प्रकल्प तयार करण्यात आले आहेत. रेल्वेला मदत करण्यासाठी कोळशाचे साठे शोधण्यासाठी 1851 मध्ये GSI सुरू करण्यात आले. तथापि, 200 हून अधिक वर्षांच्या प्रवासात, GSI भूविज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. यासोबतच याला जिओ सायंटिफिक ऑर्गनायझेशनचा दर्जाही मिळाला आहे.