पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा चौथ्यांदा होणार लिलाव

पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तू खरेदी करण्याची ही संधी २ ऑक्टोबरपर्यंत मिळणार आहे. पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या ई-लिलावाची ही चौथी आवृत्ती असणार आहे. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचे महासंचालक अद्वैत गडानायक यांनी सांगितले की, हा लिलाव १७ सप्टेंबरपासून म्हणजेच पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसापासून सुरू होईल आणि २ ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीपर्यंत चालणार आहे.

    नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये भेटवस्तू मिळत असतात. यामध्ये खेळाडू, राजकारणी आणि सामान्य माणसांनी दिलेल्या भेटवस्तूही आहेत. पीएम मोदींना मिळालेल्या या भेटवस्तूंचा दरवर्षी लिलाव (Gift Auction) होतो. यंदाही पंतप्रधान मोदींना मिळालेल्या बाराशेपेक्षा अधिक वस्तूंचा लिलाव १७ सप्टेंबरपासून होणार आहे. या लिलावातून मिळणारा सर्व पैसा ‘नमामि गंगे मिशन’मध्ये (Namami Gange Mission) वापरला जाणार आहे.

    पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तू खरेदी करण्याची ही संधी २ ऑक्टोबरपर्यंत मिळणार आहे. पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या ई-लिलावाची ही चौथी आवृत्ती असणार आहे. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचे (National Gallery Of Modern Art) महासंचालक अद्वैत गडानायक यांनी सांगितले की, हा लिलाव १७ सप्टेंबरपासून म्हणजेच पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसापासून सुरू होईल आणि २ ऑक्टोबर म्हणजेच गांधी जयंतीपर्यंत चालणार आहे. pmmementos.Gov.In या वेबपोर्टलद्वारे आयोजित करण्यात येत आहे.

    पंतप्रधान मोदींना मिळणाऱ्या भेटवस्तूंमध्ये भारताची संस्कृती आणि वारशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध भेटवस्तू असतात. लिलावासाठी ठेवलेल्या या भेटवस्तूंची मूळ किंमत १०० रुपयांपासून सुरू होऊन १० लाख रुपयांपर्यंत असणार आहे.

    पंतप्रधानांच्या भेटवस्तूंचा लिलाव होत असून या यादीत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी भेट दिलेली राणी कमलापतीची मूर्ती, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेली हनुमान मूर्ती, सूर्यचित्र, योगी आदित्यनाथ आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी भेट दिलेला त्रिशूळ, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भेट दिलेली कोल्हापुरातील देवी महालक्ष्मीची मूर्ती आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी भेट दिलेली भगवान व्यंकटेश्वराची मूर्ती यांचा समावेश आहे.