dr harshvardhan

देशात दररोज सुमारे ६० हजारहून अधिक रुग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंतेत भर पडत आहे. कोरोनावर मात करण्याकरता जगातील इतर देशांप्रमाणे भारतातही लस विकसित करण्यासाठी यु्द्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. भारतीय संशोधकांच्या या प्रयत्नांना मोठं यश आलं असून कोरोना विरोधातली लस या वर्षाअखेरीस भारतात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या भारतात गंभीर संकट निर्माण झालेले आहे. दररोज सुमारे ६० हजारहून अधिक रुग्ण सापडत असल्याने आरोग्य यंत्रणेसाठी ही डोकेदुखी वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी जगातील इतर देशांप्रमाणे भारतातही लस विकसित करण्यासाठी यु्द्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, भारतात विकसित होत असलेल्या कोरोना लसीबाबत देशाचे आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी मोठी घोषणा केली आहे.

याबाबत माहिती देताना हर्षवर्धन म्हणाले की, आमच्याकडून विकसित करण्यात येत असलेल्या कोरोनाच्या लसींपैकी एक लस संशोधनाच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. ही लस या वर्षअखेरीस पूर्णपणे विकसित होईल, असा विश्वास आम्हाला आहे.

दरम्यान, काल रात्री देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने तीस लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर शनिवारी सकाळच्या आकडेवारीनुसार देशात ६९ हजारांहून अधिक रुग्ण सापडले होते. शनिवारी सकाळी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार देशातील कोरोना रुग्णांची संख्या २९ लाख ७५ हजार ७०१ एवढी होती. काल संध्याकाळपर्यंत हा आकडा ३० लाखांच्या पार गेला आहे. तर जगभरात आतापर्यंत कोरोनाचे २ कोटी २६ लाख रुग्ण सापडले असून, तब्बल ७ लाख ९३ हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.