युपीए 26 तर एनडीए 38 पक्षांची लढत, आजचा दिवस महत्त्वाचा, ठरणार लोकसभा निविडणुकांची रणनिती, विरोधकांच्या बैठकीला शरद पवार जाणार?

विरोधकांच्या ऐक्याच्या बैठकीत पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत निर्णय होईल का, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येतेय. तसंच जागावाटपाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. दुसरीकडं भाजपाप्रणित एनडीएत लहान पक्षांना येत्या काळात महत्त्वाचं स्थान मिळेल, असे संकेत देण्यात येण्याची शक्यता आहे.

  बंगळुरु – मंगळवारचा दिवस राष्ट्रीय राजकारणातला महत्त्वाचा दिवस असणार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रमुख प्रतिस्पर्धी असलेले एनडीए आणि युपीए या दोघांच्याही बैठका मंगळवारी होणार आहेत. दोन्ही बाजूंकडून ऐक्य आणि आगामी रणनीती यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या ऐक्याच्या दुसरा अंक सोमवारपासून बंगळुरात सुरु झालाय. राहुल गांधी, सोनिया गांधी, नितीश कुमार, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांच्यासह २६ पक्षांचे नेते सहभागी होतायेत. सोनिया गांधी यांनी सर्व विरोधकांसाठी डिनर पार्टीचं आयोजन केलं. शरद पवार (Sharad Pawar) या बैठकीला मंगलवारी सकाळी पोहचणार आहेत. (Opposition Meeting)
  युपीएच्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
  1. लोकसभा निवडणुकांसाठी विरोधकांचं ऐक्य
  2. विरोधकांच्या 26 पक्षांचं जागावाटप
  3. यूपीएचं नवं नाव ठरण्याची शक्यता
  4. भाजपाला रोखण्यासाठी 400 जागांवर एकच उमेदवार उभा करण्यावर विचार
  यासह समान नागरी कायदा, मणिपूर हिंसाचार, मध्यप्रदेश राजस्थानसह ५ राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुका यासह भाजपासोबत असलेल्या पक्षांना एनडीएतून तोडण्याच्या रणनीतीवर या बैठकीत विचार होण्याची शक्यता आहे.

  एनडीएचीही बैठक
  तर दुसरीकडं २०२४ च्या निवडणुकांसाठी मोदी-शाहा यांनीही नवी रणनिती तराय केली आहे. त्याचाच भाग म्हणून नव्या जोडीदारांसह एनडीएचं शक्तिप्रदर्शनही दिल्लीत करण्यात येणार आहे.
  एनडीएच्या बैठकीत काय होणार?
  1. एनडीएच्या बैठकीत 38 पक्ष सहभागी होणार
  2. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बैठक
  3. शिरोमणी अकाली दल, एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होणार
  4. बच्चू कडू, विनय कोरे यांनाही बैठकीचं निमंत्रण
  4. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी, तेलगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक सहभागी होणार नाहीत.
  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा लोकसभा निवडणुका जिंकण्याच्या रणनीतीची आणि मुद्द्यांची चर्चा या बैठकीत होण्याची शक्यता आहे. यात समान नागरी कायद्याचा मुद्दाही महत्त्वाचा ठरेल.

  पुढं काय होणार

  विरोधकांच्या ऐक्याच्या बैठकीत पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत निर्णय होईल का, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येतेय. तसंच जागावाटपाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. दुसरीकडं भाजपाप्रणित एनडीएत लहान पक्षांना येत्या काळात महत्त्वाचं स्थान मिळेल, असे संकेत देण्यात येण्याची शक्यता आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी अवघ्या वर्षाचा कालावधी राहिलेला आहे. अशात आता पंतप्रधान मोदी आणि भाजपाला रोखण्यासाठी पहिल्यांदाच विरोधक मोठ्या संख्येनं एकत्र येताना दिसतायते. तर सावध झालेली भाजपाही नव्या मित्रपक्षांच्या मदतीनं हे आव्हान रोखण्याच्या प्रयत्नात आहे. अशात या दोन्ही बैठकांचं फलित काय असेल, यावर भविष्यातील अनेक बाबी ठरणार आहे.