ईडी चौकशीनंतर पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांची मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीकडून चौकशी करण्यात आली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची तब्बल ६ तास चौकशी केली.

    जालंधर : पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांची मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीकडून चौकशी करण्यात आली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची तब्बल ६ तास चौकशी केली. जालंधर येथील ईडीच्या प्रादेशिक कार्यालयात बुधवारी रात्री पीएमएलए अंतर्गत आपला जबाब नोंदवून ते कार्यालयातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी याबाबत माहिती दिली. मला कालच या प्रकरणात ईडीकडून चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मी ईडीसमोर हजर राहून माझा जबाब नोंदवला आहे. मला पुन्हा बोलावण्यात आलं नाही. मला जे विचारलं ते मी सांगितलं, असं चन्नी यांनी सांगितलं.

    चन्नी यांनी यासंबंधी ट्विट करून माहिती दिली. ईडीने मला काल मनी लाँडरिंग प्रकरणात जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं होतं. अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मी उत्तरे दिली. अधिकाऱ्यांनी मला पुन्हा चौकशीसाठी बोलावलं नाही, असं चन्नी यांनी ट्विटमध्ये नमूद केलं.

    याच प्रकरणात चन्नी यांचा पुतण्या भुपिंदर सिंह उर्फ हनी याला ईडीनं पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी अटक केली होती. या प्रकरणात अन्य आरोपींविरोधात जालंधरच्या विशेष पीएमएलए कोर्टात ३१ मार्च रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. हनी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.

    दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीनं चन्नी यांना यापूर्वीही अनेक वेळा समन्स बजावले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी चन्नी यांना हनी आणि अन्य संशयितांशी असलेले व्यवहार आणि मुख्यमंत्री कार्यालयात त्यांच्या पुतण्यानं दिलेल्या भेटीसंदर्भात चौकशी केली होती. राज्यात अवैध वाळू उत्खननविरोधी मोहिमेंतर्गत काही अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांमध्ये झालेल्या आरोपांसंबंधीही चौकशी केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.