फक्त दोनशे रुपयांसाठी घडले हत्याकांड; शेजाऱ्याचा खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप

अलीगड जिल्हा न्यायालयात (Aligarh District Court) तीन वर्षे जुन्या खून खटल्याची सुनावणी झाली. या खून प्रकरणात न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपीने तीन वर्षांपूर्वी केवळ 200 रुपयांसाठी शेजाऱ्याची हत्या केली होती.

    अलीगड : अलीगड जिल्हा न्यायालयात (Aligarh District Court) तीन वर्षे जुन्या खून खटल्याची सुनावणी झाली. या खून प्रकरणात न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपीने तीन वर्षांपूर्वी केवळ 200 रुपयांसाठी शेजाऱ्याची हत्या केली होती. न्यायालयाने दोषीला 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश (एडीजे) यांनी केली.

    8 मे 2020 रोजी झालेल्या खून प्रकरणाबाबत, सरकारी वकील (एडीजीसी) जेपी राजपूत म्हणाले, आरोपी जगदीश उर्फ जग्गूने शेजारी असलेल्या टिटूकडून 200 रुपये उसने घेतले होते. टिटूने उधारीचे पैसे मागितल्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. त्यावर जगदीशने टिटूच्या पोटात चाकूने वार करून जखमी केले. त्याला गंभीर अवस्थेत नेहरू वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले, तेथे उपचारादरम्यान टिटूचा मृत्यू झाला.

    टीटूने मृत्यूपूर्वी दिली जबानी

    मृतकाचा चुलत भाऊ महेश चंद्र यांच्या फिर्यादीवरून गांगिरी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध भादंवि कलम 307 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला कारागृहात पाठवले होते. जेपी राजपूत यांनी सांगितले की, मृताने मृत्यूपूर्वी तपास अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. या प्रकरणात एकूण 9 जणांनी साक्ष दिली होती.