संसदेच्या विशेष अधिवेशनाची कार्यक्रमपत्रिका अखेर जाहीर; 18 सप्टेंबरपासून सुरू होणार अधिवेशन

केंद्र सरकारकडून संसदेचे विशेष अधिवेशन (Parliament Session) बोलावण्यात आले आहे. तब्बल 14 दिवसांच्या गुप्ततेनंतर या अधिवेशनाची कार्यक्रमपत्रिकाही जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, येत्या सोमवारपासून म्हणजे 18 सप्टेंबरपासून हे विशेष अधिवेशन सुरु होत आहे.

    नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून संसदेचे विशेष अधिवेशन (Parliament Session) बोलावण्यात आले आहे. तब्बल 14 दिवसांच्या गुप्ततेनंतर या अधिवेशनाची कार्यक्रमपत्रिकाही जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, येत्या सोमवारपासून म्हणजे 18 सप्टेंबरपासून हे विशेष अधिवेशन सुरु होत आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनाची कार्यक्रमपत्रिका जाहीर झाल्याने या अधिवेशनात नेमके कोणते मुद्दे उपस्थित होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

    केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती संदर्भातील विधेयक वगळता अन्य वादग्रस्त विधेयके अधिवेशनात मांडले जाणार नसल्याचे लोकसभा सचिवालयाने प्रसिद्ध केलेल्या ‘बुलेटिन-2’वरून स्पष्ट झाले. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी  संध्याकाळी साडेचार वाजता सर्वपक्षीय बैठकीचेही आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक केंद्रीय संरक्षणमंत्री व लोकसभेचे उपनेते राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत होईल.

    या बैठकीमध्ये विरोधकांकडून आक्षेपाचे अनेक मुद्दे मांडले जाण्याची शक्यता आहे. पाच दिवसांच्या अधिवेशनामध्ये प्रश्नोत्तर, शून्य प्रहर होणार नाही. तसेच, खासगी विधेयकेही मांडली जाणार नाहीत. संसदेचे पाच दिवसांचे विशेष अधिवेशन पुढील आठवड्यात 18 सप्टेंबरपासून सुरू होणार असून, पहिल्या दिवशी संविधान सभा, योगदान, अनुभव, आठवणी, संसदेच्या 75 वर्षांच्या प्रवासावर चर्चा केली जाणार आहे.