महिलेच्या मृत्यूसाठी धरले उंदराला जबाबदार; पोलिसही चक्रावले

महिलेच्या मृत्यूला जबाबदार ठरले आहेत, घरातील उंदीर! पोलिसांना या महिलेच्या घरातील लोकांनी हा तर्क सांगितला तेव्हा तेही चक्रावून गेले.

इंदोर. मध्य प्रदेशातील इंदोरमधील सिमरोल पोलिस स्थानक हद्दीतील तलाई नाका भागातील एक महिला घरात अत्यवस्थ अवस्थेत आढळली होती. तिला रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचे कारण मात्र अतिशय विचित्र आहे. तिच्या मृत्यूला जबाबदार ठरले आहेत, घरातील उंदीर! पोलिसांना या महिलेच्या घरातील लोकांनी हा तर्क सांगितला तेव्हा तेही चक्रावून गेले.

असे आहे प्रकरण
मृत महिलेचे नाव सावित्रीबाई असून रात्री त्यांचे पती लीलाधर यांनी त्यांना अत्यवस्थ अवस्थेत एम. वाय. हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांच्या मते उंदीर मारण्याचे औषध पोटात गेल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली होती, त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले. त्यामध्ये यश न आल्यामुळे सावित्रीबाई यांचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार घटनेच्या दिवशी सावित्रीबाईंचे पती लीलाधर काही कामानिमित्त सिमरोल याठिकाणी गेले होते, त्यांना त्यांच्या घरातून सावित्रीबाई यांची तब्येत अचानक बिघडल्याचा फोन आला. धावतपळत ते घरी आले आणि त्यांनी सावित्रीबाई यांना हॉस्पिटलमध्ये नेले.

उंदराचे औषध गेले पोटात
लीलाधर यांनी दिलेल्या माहितीनुसार घरात उंदीर झाल्यामुळे उंदीर मारण्याच्या औषधाची बाटली आणली होती, जी कपाटावर ठेवण्यात आली होती. अशी शंका उपस्थित केली जाते आहे की ती बाटली उंदरांनी पाडली असावी आणि त्याच ठिकाणी सावित्रीबाई झोपत असत. त्यातील औषध त्यांच्या पोटात गेल्याने सावित्रीबाईंचा मृत्यू झाला असावा. त्याबाबत चौकशी करताना, सावित्रीबाई यांचे पती लीलाधर यांनी सांगितलेली ही माहिती जरी चक्रावून सोडणारी असली, तरी सध्या त्याआधारे पोलिस तपास करत आहेत.

आत्महत्येच्या संशयास कुटुंबीयांचा नकार
पोलिस सध्या हा एक अपघात असल्याचे गृहीत धरून तपास करत आहेत; पण त्यांना पोस्टमॉर्टेम अहवालाची प्रतीक्षा आहे, त्यावरून अनेक गोष्टी स्पष्ट होतील, असे पोलिस निरीक्षक जगन्नाथ यांनी म्हटले आहे. मात्र, सावित्रीबाई यांनी आत्महत्येच्या उद्देशाने स्वतः हे औषध घेतले असल्याची शंका त्यांच्या घरच्यांनीच नाकारली आहे. त्यामुळे सावित्रीबाई यांच्या पोटात हे औषध गेले कसे, हा प्रश्न उभा राहिला.