तिहार तुरुंग अधीक्षक निलंबित, केजरीवालांचे मंत्री सत्येंद्र जैन यांना VIP ट्रिटमेंट दिल्याचा आरोप

तिहार तुरुंगाचे अधीक्षक अजित कुमार यांना दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी निलंबित केल्याची माहिती दिल्ली सरकारच्या तुरुंग विभागाने दिली आहे.

    नवी दिल्ली – दिल्लीतील केजरीवाल सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याबद्दल तिहार जेलच्या अधीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. गत महिन्यात ईडीने कोर्टात आरोप केला होता की, तिहार तुरुंगात सत्येंद्र जैन यांना हेड मसाज, पायाची मसाज आणि बॅक मसाज यासारख्या सर्व सुविधा पुरवल्या जात आहेत. तपास यंत्रणेने CCTV फुटेजही न्यायालयात सादर केले आहे.

    तिहार तुरुंगाचे अधीक्षक अजित कुमार यांना दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी निलंबित केल्याची माहिती दिल्ली सरकारच्या तुरुंग विभागाने दिली आहे. प्राथमिक चौकशीत त्यांनी अनियमितता केल्याचे निष्पन्न झाले असून त्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अजित कुमार हे DANICS अधिकारी आहेत.

    आम आदमी पक्षाचे मंत्री सत्येंद्र जैन तिहार तुरुंगात मजेत वेळ घालवत असल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी ईडीने प्रतिज्ञापत्र आणि काही छायाचित्रे देऊन कोर्टात तक्रार केली होती. सत्येंद्र जैन यांना तिहार तुरुंगात अनेक सुविधा मिळत असून कारागृहातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते पाठीची आणि पायाची मालिश करताना दिसत आहेत, असे ईडीने म्हटले होते. कारागृह अधीक्षक नियमाविरुद्ध जाऊन सत्येंद्र जैन यांना भेटतात. तसेच त्यांना कारागृहात काही अडचण आहे का हेही विचारतात, असेही ईडीने म्हटले आहे.