खासदारांची दिल्लीत तिरंगा बाइक रॅली; अनेक केंद्रीय मंत्र्यांचा सहभाग

यावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि पियुष गोयल हे देखील उपस्थित होते. या तिरंगा रॅलीत एनडीएचे अनेक नेते आणि खासदारही सहभागी झाले होते. खासदार व्ही.के. सिंह बुलेटवर तिरंगा लावून रॅलीत सामील झाले. स्मृती इराणी आपल्या स्कूटरवर तिरंगा फडकावला. यावेळी त्या सर्वात आघाडीवर होत्या. याशिवाय केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखीही या रॅलीत सहभागी झाल्या होत्या.

    नवी दिल्ली – देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्ताने दिल्ली येथील लाल किल्ल्यावरून संसद भवनापर्यंत तिरंगा बाइक रॅली काढण्यात आली होती. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी लाल किल्ल्यावरून तिरंगा बाइक रॅलीला हिरवा झेंडा दाखवला आणि त्यानंतर सर्व संसद सदस्यांच्या उपस्थितीत रॅलीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.

    यावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि पियुष गोयल हे देखील उपस्थित होते. या तिरंगा रॅलीत एनडीएचे अनेक नेते आणि खासदारही सहभागी झाले होते. खासदार व्ही.के. सिंह बुलेटवर तिरंगा लावून रॅलीत सामील झाले. स्मृती इराणी आपल्या स्कूटरवर तिरंगा फडकावला. यावेळी त्या सर्वात आघाडीवर होत्या. याशिवाय केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखीही या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. विजय चौकात रॅलीचा समारोप झाला.

    सांस्कृतिक मंत्रालयाने तिरंगा बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घराघरात तिरंगा फडकवण्याचे आवाहनही देशातील सर्व जनतेला करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत सुमारे २० कोटी तिरंगा फडकवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मंगळवारी झालेल्या भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सर्व राजकीय पक्षांच्या खासदारांना या रॅलीत उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. हा कार्यक्रम भाजपने नव्हे तर सांस्कृतिक मंत्रालयाने आयोजित केला आहे, असे जोशी म्हणाले होते. त्यांनी सर्व खासदारांना बुधवारी सकाळी ८.३० वाजता लाल किल्ल्यावर पोहोचण्यास सांगितले होते.