‘आज सगळेच मनोरे कोसळून पडताना दिसत आहेत’ – संजय राऊत

२०१४ पासून पंतप्रधान मोदी यांनी संसदेत इतर नेत्यांच्या केलेल्या नकलांचे व्हिडीओ समोर आले व ते गमतीचे आहेत. पंडित नेहरू, लालबहाद्दूर शास्त्री, इंदिरा गांधी, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर अशी टोलेजंग माणसे त्या सभागृहात कधीकाळी वावरत होती. तेव्हा लोकप्रतिनिधी कुत्रे किंवा माकडांप्रमाणे वागत नव्हते हे पाहिले; तर सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीही त्या वेळी पदाची आणि देशाची शान ठेवूनच वावरत होत्या हे दुसरे. आज सगळेच मनोरे कोसळून पडताना दिसत आहेत!

  दिल्लीच्या राजकारणात स्वतःला ‘देव’ म्हणवून घेणारे तोऱ्यात वावरत आहेत व राजकीय विरोधकांना ते रोज अपमानित करीत आहेत. देशात ‘Free and Fair’ असे काही उरलेच नाही. जया बच्चन यांनी राज्यसभेत संतापाने उभे राहून सरकार पक्षाला शाप दिला, त्याची चर्चा अजून सुरूच आहे! असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी आजच्या रोखठोक सदरातून केंद्र सरकारवर निषाणा साधला आहे.

  काय म्हटलंय संजय राऊत यांनी?

  लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर संपूर्ण कफन ओढून सरकारी पक्षाने संसदेचे अधिवेशन संपवले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करणाऱ्या १२ राज्यसभा खासदारांचे निलंबन शेवटपर्यंत रद्द केले नाही. हे बारा खासदार शेवटपर्यंत संसद भवनासमोरील गांधी पुतळ्यापाशी बसून राहिले. लोकशाहीत विरोधकांच्या वर्तनावर नेहमी बोट दाखविले जाते, पण सत्ताधाऱ्यांचे वर्तन हे कितीही बेकायदेशीर असले तरी त्यांच्याकडे कोणी बोट दाखवीत नाही.

  राज्यसभेत जया बच्चन संतापाने थरथरत उभ्या राहिल्या व म्हणाल्या, ‘मी तुम्हाला शाप देत आहे. तुमचे बुरे दिन लवकरच सुरू होत आहेत. तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा करणे चूक आहे. आमचा गळाच एकदाचा घोटून टाका. लोकशाही संपूर्ण खतम करा,’ असे बच्चन म्हणाल्या. तेव्हा संसदेची ती ऐतिहासिक इमारतही क्षणभर थरथरली असेल. विरोधी पक्षाचा इतका अवमान यापूर्वी कधीच झाला नसेल.

  पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारात अडकले. संसदेला वाऱ्यावर सोडले आणि लोकशाही संसद भवनासमोरील गांधी पुतळ्यापाशी उघड्य़ावर पडली असे चित्र दिसले. ते विदारक होते.

  जुन्या ‘मातोश्री’ निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत एक वाक्य कोरलेली पाटी होती. ‘‘जो जो मी निर्वाचित जनप्रतिनिधींचे चाळे पाहतो तो तो मला माझ्या कुत्र्यांची जास्तच प्रशंसा करावीशी वाटते.” यावर बाळासाहेब ठाकरे चिरुटाचा धूर सोडत म्हणत, ‘तुम्ही कुत्र्यांचा यात अपमान करीत आहात! माणसांपेक्षा ते एकनिष्ठ असतात!

  आज दिल्लीच्या राजकारणात स्वतःला ‘देव’ म्हणवून घेणारे वावरत आहेत. ते विरोधकांना कुत्र्यांसारखे वागवीत आहेत. पण दिल्लीचा इतिहास असे सांगतो, “Every dog has his days.” हे जगभरातील राजकारणात अनुभवण्यास येते. त्यावर भाजपचेच एक कोंडमारा झालेले मंत्री हळूच म्हणाले, “dog चे काय घेऊन बसलात. dog हा शब्द उलटा करून पहा, Every god has also his day!” तेच खरे आहे.

  लोकशाहीचे महत्त्व, पक्षीय निष्ठा याचे मोल कसे संपले आहे ते आता रोजच दिसत आहे. न्यायाचे तर सारे खोबरे झाले आहे. देशात Free and Fair असे काही उरलेच नाही. मंगळवारी राज्यसभेतील गोंधळ पाहून शरद पवार यांनी विचारले, ‘‘अजूनही संसदेचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना संसदेत येण्यावर बंदी आहे. हे बरोबर नाही.’’ लोकसभा व राज्यसभेच्या पत्रकार कक्षातून डोकावणारे पत्रकार ही लोकशाहीची खरी मौज होती. संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात येण्यापासून पत्रकारांना थांबविले गेले. ‘‘लोकांचा लोकांशी फार संपर्क होऊ द्यायचा नाही. बोलणाऱ्यांच्या भोवती तटबंदी उभी करायची, असे या सरकारचे एकंदरीत धोरण आहे,’’ अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली.

  अनंत बागाईतकर हे ३० वर्षे दिल्लीत पत्रकारिता करीत आहेत. संसदेच्या माध्यम सल्लागार समितीचे ते सचिव, पण चार दिवसांपूर्वी त्यांनी सचिवपदाचा राजीनामा राज्यसभेचे चेअरमन व्यंकय्या नायडू यांच्याकडे पाठवला. पत्रकारांना संसदेत प्रवेश नाकारला जात असेल तर पदावर राहून काय फायदा? संसदेत प्रेक्षक गॅलऱ्या बंद केल्या हे एक वेळ समजू शकतो, पण पत्रकारांच्या गॅलऱ्याही बंद ठेवल्या. हे सर्व सरकारी मर्जीने सुरू आहे! संसदेच्या आवारातील भव्य पुतळ्य़ांनाही एकेकाळी जिवंतपणा होता. आता संसदेत वावरणारी सत्तापदावरील माणसेही निर्जीव असल्यासारखी वागतात. गेली अनेक वर्षे मी संसदेच्या आवारात वावरतो आहे.

  गेल्या पिढीत व आमच्या पिढीतील फरक कोणता, असे काहीजण मला विचारतात, तेव्हा मी त्यांना असे सांगतो की, तुमच्या पिढीने मनोरे उभारताना पाहिले. आमच्या पिढीने ते कोसळताना पाहिले. आदर्श, परंपरा, संस्कारांचे सर्व मनोरे एकामागून एक कोसळून पडावे तसे घडले आहे, घडत आहे. त्या मनोऱ्यांच्या ढिगाऱ्यातून अडथळे पार करत संसदेत पोहोचावे लागते. हे आजच्या दिल्लीचे चित्र आहे.

  लोकप्रतिनिधींचे चाळे पाहतो तेव्हा मला माझ्या कुत्र्यांची आठवण येते असे सांगितले गेले, पण अनेकदा ‘माकडचेष्टा’ हाच शब्दप्रयोग त्यासाठी उपयुक्त ठरेल. महाराष्ट्राच्या विधानसभेत भास्कर जाधव यांनी पंतप्रधान मोदी यांची नक्कल केली म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांसह सभागृह डोक्यावर घेतले. ‘‘पंतप्रधानांची नक्कल कोण, कशी करू शकतो?’’ हा त्यांचा प्रश्न होता.

  आमच्या देशाचे पंतप्रधान म्हणजे सर्वश्रेष्ठ व्यक्ती. तिचे वागणे, बोलणे इतके उपहासाचे व्हावे हे चांगले नाही, पण जाधव यांनी नक्कल केली म्हणजे काय केले? देशातील प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात पंधरा लाख रुपये टाकू, असे वचन मोदी यांनी निवडणूक प्रचारसभांतून २०१४ मध्ये दिले होते ते मोदींच्याच लकबीत जाधव सांगत राहिले. ‘‘मोदी यांनी असे वचन दिलेच नव्हते. जाधव, नितीन राऊत ही मंडळी खोटे बोलत आहेत,’’ अशी गर्जना फडणवीस यांनी करावी हा विरोधी पक्षाच्या अज्ञानाचा अतिरेक आहे.

  इंटरनेटच्या युगात मागचा इतिहास एका ‘क्लिक’वर उपलब्ध होतो, त्यामुळे मोदी यांची १५ लाखांची भाषणे लोकांनी समोर आणली. २०१४ पासून पंतप्रधान मोदी यांनी संसदेत इतर नेत्यांच्या केलेल्या नकलांचे व्हिडीओ समोर आले व ते गमतीचे आहेत. पंडित नेहरू, लालबहाद्दूर शास्त्री, इंदिरा गांधी, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर अशी टोलेजंग माणसे त्या सभागृहात कधीकाळी वावरत होती. तेव्हा लोकप्रतिनिधी कुत्रे किंवा माकडांप्रमाणे वागत नव्हते हे पाहिले; तर सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीही त्या वेळी पदाची आणि देशाची शान ठेवूनच वावरत होत्या हे दुसरे. आज सगळेच मनोरे कोसळून पडताना दिसत आहेत!